पणजी : सरकार आर्थिक अडचणीतून जात आहे व त्यामुळे सध्या राज्यातील कोणत्याही व्यवसाय धंद्यासाठी सरकार पॅकेज देऊ शकणार नाही असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंगळवारी येथे स्पष्ट केले. अनेक उद्योग- व्यवसाय अडचणीत आहेत याची सरकारला कल्पना आहे व सरकार स्थिती समजून घेते पण सध्याच्या टप्प्यावर तरी आम्ही कुणाला पॅकेज देऊ शकत नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.सावंत यांनी येथे पत्रकार परिषद घेतली. राज्यातील विविध व्यवसायातील घटक मला फोन करतात, तसेच मेलद्वारे व अन्य प्रकारेही संदेश पाठवतात. सरकारने पॅकेज द्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. सध्या सगळेच अडचणीत आहेत हे प्रत्येकाने समजून घ्यावे, असे मुख्यमंत्री म्हणाले. जे लोक भाडय़ाच्या घरात राहतात, त्यांच्याकडून कुणी एका महिन्याचे भाडे सध्या घेऊ नये असे मुख्यमंत्र्यांनी पुन्हा सूचविले. अनेक मासळी व्यवसायिक वगैरे साठवून ठेवलेली मासळी आता ज्यादा दराने विकतात अशा तक्रारी येतात. आम्ही प्रसंगी चौकशी सुरू करू. कुणीच लोकांच्या स्थितीचा सध्या गैरफायदा घेऊन ज्यादा दराने मासळी विकू नये असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.खलाशांबाबत केंद्र निर्णय घेईलहजारो गोमंतकीय जहाजावर विदेशात अडकले आहेत व तिथे त्यांना निगराणीखाली ठेवले गेले आहे. त्यांना गोव्यात आणल्यास त्यांना इथे ठेवता येईल पण त्यांना गोव्यात आणण्यासाठी केंद्रीय विदेश व्यवहार मंत्रलयाची आम्हाला मान्यता हवी आहे. हा राष्ट्रीय विषय आहे, केवळ गोवेकरच नव्हे तर देशातील हजारो लोक अशा प्रकारे विदेशात अडकले आहेत. त्यांच्याविषयी काय निर्णय घ्यावा ते केंद्र सरकार ठरवील, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मला सासष्टी तालुक्यातील अनेक आमदार मंगळवारी भेटले. त्यांच्यासोबत माझी बैठक झाली. मी विदेशातील गोमंतकीयांचा विषय दोनवेळा पंतप्रधानांसमोर मांडला आहे. केंद्र सरकार त्यावर विचार करत असून अजून केंद्राचा निर्णय झालेला नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
Coronavirus : सरकार आर्थिक अडचणीत, सध्या पॅकेज अशक्य : मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2020 7:27 PM