पणजी : सरकार सोमवारपासून लॉकडाऊनचे निकष थोडे शिथिल करत आहे. केंद्रीय गृह मंत्रलयाच्या सूचनेनुसार काही व्यवसाय व व्यवहार सोमवारपासून सुरू होतील. विशेष म्हणजे 33 टक्के सरकारी कर्मचारी सोमवारपासून कार्यालयात उपस्थित असणे गरजेचे आहे. त्याबाबतचा आदेश शनिवारी सरकारने जारी केला.
सरकारी कर्मचा-यांनी कार्यालयात यावे म्हणून कदंब वाहतूक महामंडळाच्या बसगाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्वसाधारण प्रशासन खात्याने शनिवारी काढलेल्या आदेशातून सरकारी कार्यालये कशा प्रकारे चालावीत ते स्पष्ट केले गेले आहे. पोलीस, अग्नीशामक, आपत्ती व्यवस्थापन, पालिका प्रशासन सेवा ही खाती कोणत्याच निर्बंधांविना सुरू राहतील. याशिवाय अन्य सरकारी खात्यांनी 33 टक्के कर्मचारी घेऊन काम करणे अपेक्षित आहे. अ आणि ब गटातील अधिका-यांनी कार्यालयात यावे. क व त्याखालील गटतील 33 टक्के कर्मचा-यांनी कार्यालयात यावे असे नव्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
कार्यालयात सोशल डिस्टंसिंग पाळले जावे. लोकांना त्यांची सेवाविषयक कामे कर्मचा-यांनी करून द्यावीत. 33 टक्के कर्मचारी कार्यालयात आल्यानंतर बाकीचे जे कर्मचारी राहतात, त्यांनी घराकडून काम करावे, असे आदेशात म्हटले आहे. जे कर्मचारी अत्यंत गरजेचे त्यांनी रोज यावे व इतरांनी एक दिवस घरी राहून दुस-या दिवशी यावे अशी पद्धत सुरू करावी. सकाळी नऊ ते सायंकाळी चार, सकाळी साडेनऊ ते सायंकाळी पाच व सकाळी दहा ते सायंकाळी साडेपाच अशा पद्धतीने तीन गटांमध्ये कर्मचा-यांनी नव्या वेळेप्रमाणो कार्यालयात यावे, असे आदेशात म्हटले आहे. घराकडून काम करणारे अधिकारी फोनवर उपलब्ध असावेत. हा आदेश येत्या दि. 3 मेपर्यंत कायम असेल, असे अव्वल सचिव श्रीपाद आर्लेकर यांनी म्हटले आहे.