पणजी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोव्यात प्रथमच हेल्थ इमर्जन्सीसदृश्य स्थिती आहे. गोवा सरकारने आंतरराज्य बससेवा बंद करण्याचा निर्णय घेतला व सरकारी कदंब महामंडळाची आंतरराज्य बससेवा त्वरित निलंबित केली गेली. गोमंतकीयांनी व पर्यटकांनीही सध्या किनाऱ्यांवर गर्दी करू नये अशा प्रकारचा सल्ला आरोग्यमंत्र्यांनी दिला आहे. पूर्ण गोव्यात जमावबंदीही लागू झालेली आहे. केशकर्तनालय म्हणजे सलूनही बंद करण्याचा निर्णय झाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांशी शुक्रवारी सायंकाळी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधल्यानंतर गोवा सरकारला स्थिती किती गंभीर आहे याची जाणीव झाली. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी शनिवारी सकाळी पत्रकार परिषद घेतली व गोमंतकीयांच्या आरोग्याच्या हितासाठी सर्वात कडक अशा उपाययोजना सुरू केल्या जातील असे सांगितले. या उपाययोजनांची सुरुवात झाली आहे. यूएईमधून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला चौदा दिवस स्वत:च्या घरी निगराणीखाली राहावे लागेल. तसेच देशी पर्यटकांचीही विमानतळावर तपासणी सुरू झाली आहे. जी कुटूंबे चार चाकी वाहनातून गोव्याबाहेर जातात किंवा बाहेरून गोव्यात येतात, त्यांच्यापैकी कुणाला ताप वगैरे आहे काय याची तपासणी सीमेवरच केली जाईल, असे मंत्री राणे यांनी सांगितले.
गोमंतकीयांनी सध्या किनाऱ्यावर जाऊ नये. महाराष्ट्र, कर्नाटक आदी गोव्याच्या शेजारील राज्यांतील पर्यटकांनीही सध्या गोव्यात येऊ नये. त्यांना सीमेवरून पोलिसांकडून परत पाठवले जाईल. आरोग्याच्यादृष्टीने आणीबाणीचीच स्थिती आहे. पर्यटक गोव्यात अकारण इथे-तिथे फिरणार नाही असे अपेक्षित आहे. जे कुणी आहे तेही परत जातील. सध्याच अनेक हॉटेल्स ओस पडली आहेत. एका तारांकित हॉटेलमधील विवाह सोहळा त्वरित बंद करा असा आदेश आम्ही दिला. कुठेच गर्दी होऊ नये, सध्या प्रत्येकानेच काळजी घ्यावी, असे मंत्री राणे यांनी सांगितले. आंतरराज्य बससेवा बंद होतील व सगळे काही ठप्प झाल्यासारखा अनुभव येईल. केशकर्तनालयेही बंद केली जातील. अत्यंत कडक उपाययोजनांना सामोरे जाण्यासाठी आम्ही सर्वांनीच सज्ज रहावे, असे राणे म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोव्यात संचारबंदी लागू
Coronavirus: ...तर कोरोना विषाणू जास्त काळ टिकणार नाही; राजेश टोपेंची मोलाची सूचना
Coronavirus : कोरोना व्हायरसमुळे Apple ने घेतला 'हा' मोठा निर्णय
Coronavirus : 5G टेक्नॉलॉजी कोरोना व्हायरस नष्ट करणार,चीनचा दावा
Coronavirus : जगभरात कोरोना अलर्ट! जाणून घ्या, कोणत्या देशात किती कोरोनाग्रस्त?