पणजी : कदंब महामंडळाने ‘कोरोना’ व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सॅनिटायझर्सद्वारे बसगाड्यांचे निर्जंतुकीकरण सुरु केले आहे. राज्यांतर्गत धावणाऱ्या बसगाड्यांबरोबरच कोल्हापूर, पुणे, बंगळुरु, मुंबई आदी आंतरराज्य मार्गांवरील बसगाड्यांमध्येही सॅनिटायझर फवारणी केली जात आहे.कदंब महामंडळाचे वाहतूक विभाग सरव्यवस्थापक संजय घाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार आंतरराज्य मार्गावर धावणाऱ्या कदंबच्या ९४, कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या ६७ आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ४५ तसेच सुमारे २00 खाजगी आंतरराज्य बसगाड्यांचे निर्जंतुकीकरण बुधवारी करण्यात आले. याशिवाय राज्यांतर्गत विविध मार्गांवर धावणाऱ्या कदंबच्या बसेसमध्येही सॅनिटायझर फवारणी केली जाते. रोज सुमारे २0 लिटर सॅनिटायझर दहापट पाणी मिसळून फवारणी केली जाते. घाटे यांनी असेही सांगितले की, कदंब बस स्थानकेही धुवून स्वच्छ केली जातात. मंगळवारी वास्को, वाळपई, होंडा, सांखळी येथील बसस्थानके माजी कर्मचारी तसेच चालक, वाहकांनी स्वच्छ केली. काल बुधवारी डिचोली स्थानक स्वच्छ करण्यात आले. राज्यात १६ बसस्थानके आहेत तेथे रोज साफसफाई तसेच निर्जंतुकीकरण केले जाते, असा दावा त्यांनी केला. कदंब महामंडळाच्या कार्यालयात सॅनिटायझर ठेवण्यात आले आहेत. तेथे हात स्वच्छ करुनच कार्यालयात प्रवेश करावा लागतो.
Coronavirus: ‘कदंब’कडून बसगाड्यांचे निर्जंतुकीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 9:00 PM