पणजी - गोव्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने रुग्णालयांवर वाढलेला ताण लक्षात घेता मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बुधवारी लॉकडाऊनची घोषणा केली. उद्या (दि.२९) सायंकाळी ते सोमवारी सकाळपर्यंत लॉकडाऊन असेल. गोव्यात सध्या दर २४ तासांत दोन हजार नवे रुग्ण आढळतात व तीस कोरोनाग्रस्तांचा जीव जात आहे. त्यामुळे सरकारमधील आणि काही विरोधकांनी लॉकडाऊनची मागणी केली होती. सावंत सरकारवर राजकीय दबाव आला होता. अखेर त्यांनी लॉकडाऊन जाहीर केला.
मुख्यमंत्री म्हणाले की, लोकांनी काम नसताना बाहेर फिरू नये किंवा गर्दी करू नये, असे सांगितले तरी लोक ऐकत नाहीत. त्यामुळेच चार दिवस गोव्यात लॉकडाऊन करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. चार दिवस गोव्यात पर्यटन बंद राहील. ज्या पर्यटकांनी गोव्यात खोली आरक्षित केली आहे त्यांनी येऊन खोलीतच राहावे. आम्ही राज्याच्या सीमा बंद केलेल्या नाहीत. सीमा खुल्या राहतील, पण चार दिवस राज्यात कुठेच पर्यटक फिरू शकणार नाहीत.
लॉकडाऊनमध्येही उद्योग सुरू राहतील. औषधालये व जीवनावश्यक वस्तूंची विक्री सुरू राहील. मजुरांनी घाबरून जाऊ नये. सोमवारपासून सर्व काही सुरळीत सुरू होईल. गोव्यातील कॅसिनो, जुगार केंद्रे, मद्यालये हे बंद राहील. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद राहील. नाईट कर्फ्यू पूर्वी जाहीर केल्याप्रमाणे सुरू राहील, असेही मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.
काय सुरू अन् काय बंद...
- अत्यावश्यक सेवा सुरू. जीवनावश्यक सेवेअंतर्गत येणारी दुकाने सुरू.
- सार्वजनिक वाहतूक, कॅसिनो, बाजार पूर्णपणे बंद राहणार.
- बार, रेस्टॉरन्ट बंद राहतील. होम डिलिव्हरी सुरू राहील.
- औद्योगिक कंपन्या व त्याअंतर्गत येणारी वाहतूक सुरू.
- कडक कारवाईचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश
आणखी २१ बळी
बुधवारी कोरोनाने आणखी २१ व्यक्तींचे बळी घेतले. २७०० हून अधिक रुग्ण आढळले. अजूनही रुग्णांना सरकारी रुग्णालयात पुरेशा खाटा उपलब्ध होत नाहीत, अशी माहिती लोकमतला मिळाली आहे.