पणजी : गोव्यात आतापर्यंत 800 हून अधिक कोरोना चाचण्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. साडे पंधरा लाख लोकसंख्येच्या गोव्यात आतापर्यंत एक हजार देखील व्यक्तींच्या कोरोना चाचण्या झालेल्या नाहीत. पण आठशेपेक्षा जास्त चाचण्यांचे अहवाल प्रयोगशाळेत नकारात्मक आले. यावरून गोवा सुरक्षित असल्याचा निष्कर्ष स्थानिक प्रशासन काढत आहे.
गोव्यात आता कोरोनाचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही, ही समाधानकारक गोष्ट आहे. सर्व गोमंतकीयांच्या कोरोना चाचण्या करण्याची गरज नाही, असे आरोग्य खात्याचे म्हणणे आहे. तेवढ्या प्रमाणात सुविधाही राज्यात उपलब्ध नाही. पण सर्वेक्षणावेळी श्वासोश्वासाचा त्रास असलेले जे काही हजार रुग्ण सापडले आहेत, त्या रुग्णांपैकी ज्यांना विदेशी किंवा देशांतर्गत प्रवाशांची पार्श्वभूमी आहे, त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही नुकतेच तसे विधान केले आहे.
गोव्यात कोरोनाचे जे सात रुग्ण सापडले होते, त्यापैकी सगळे ठिक झाले. याचे श्रेय डॉ. एडवीन गोम्स व अन्य डॉक्टर्स आणि परिचारिकांना जाते. राजकीय नेतृत्वालाही त्याचे श्रेय जाते. मात्र गोव्यात अजून जास्त संख्येने कोरोना चाचण्या व्हायला हव्या, असे अनेकांचे मत आहे. आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांना 'लोकमत'ने विचारले असता, 'आम्ही मोठ्या संख्येने चाचण्या करण्याची क्षमता आता प्राप्त केलेली आहे', असे त्यांनी सांगितले.
गेल्या दहा दिवसांत दोनशेपेक्षा जास्त व्यक्तींच्या कोरोना चाचण्या गोमेकॉच्या प्रयोगशाळेत करण्यात आल्या. त्या सगळ्य़ा निगेटिव्ह आल्या. सुमारे साडे आठशे व्यक्तींच्या कोरोना चाचण्या केल्या गेल्या. सर्वाचे अहवाल अजून आलेले नाहीत. रविवारपर्यंत 826 व्यक्तींच्या चाचण्या केल्या गेल्या होत्या. तरी 46 व्यक्तींच्या चाचण्यांचे अहवाल येणो बाकी होते.