- सुशांत कुंकळयेकर
मडगाव: कोविडमुळे मृतांची संख्या एकाबाजूने वाढत असून दुसऱ्या बाजूने हे मृतदेह जपून ठेवण्यासाठी शवागारात पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने प्रशासनही हतबल झाले आहे. अशातच कोविडच्या भयाने नादुरुस्त झालेली शवागारे दुरुस्त करण्यासाठी तंत्रज्ञही राजी होत नसल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे.
फातोर्डा येथील 51 वर्षीय मृताच्या 'त्या' घटनेने कित्येक गोष्टी आता उजेडात आणल्या आहेत. हॉस्पिटलच्या शवागारात 20 तर कोविड (ईएसआय) इस्पितळाच्या शवागारात 8 मृतदेह ठेवता येतात. नव्या जिल्हा इस्पितळातील शवागारात 80 मृतदेह ठेवता येणे शक्य असले तरी हे शवागार अजून सुरू झालेले नाही.
मिळालेल्या माहितीप्रमाणे हॉस्पिसिओतील शवागार पूर्णपणे भरले असून त्यात असलेल्या मृतदेहांची लगेच वासलात न लावल्यास स्थिती बिकट होण्याची शक्यता आहे. कोविड इस्पितळातील दोनपैकी एक युनिट सध्या बंद पडल्याने तिथे केवळ 4 मृतदेहच ठेवता येतात. बंद पडलेले शवागार दुरुस्त कारायचे झाल्यास सर्व यंत्रणा बंद करावी लागत असल्याने ही दुरुस्तीही होऊ शकत नाही. एव्हढेच नव्हे तर कोविडच्या भयाने तंत्रज्ञही दुरुस्ती करण्यासाठी येणे टाळतात.
हॉस्पिसिओच्या शवागाराची स्थिती त्याहून बिकट आहे. हे शवागार ब्लू स्टार कंपनीचे असून त्याचे सुटे भाग चीनहून मागवावे लागतात. या शवागाराच्या काही कक्षाचे हँडल तुटल्याने त्यांना काठीचा आणि खुर्चीचा आधार लावून बंद करावे लागत होते. त्यामुळे शवागारात वारा जाऊन मृतदेह कुजण्याचेही प्रकार झाले होते.( हा प्रकार सोमवार दि.24 रोजी घडला होता). नंतर त्यात मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी लक्ष घातल्यावर या शवागाराची दोन दिवसापूर्वी दुरुस्ती करण्यात आली.
हॉस्पिसिओ कर्मचाऱ्यांनाही दोष देता येणार नाही कारण काही लोक दोन दिवस मृतदेह ठेवतो असे सांगून सात आठ दिवस मृतदेह हलवीत नाहीत. काही मृतांचे आप्त विदेशातून यायचे आहेत असे कारण सांगून मृतदेह शवागारातच ठेवून देतात. कोविडचे रुग्ण वाढत असताना एकच मृतदेह सहा सात दिवस शवागारात ठेवून घेणे कसे परवडेल असा सवाल या कर्मचाऱ्यांनी केला.
जिल्हा इस्पितळातील शवागाराची अजून चाचणीचनवीन जिल्हा इस्पितळाचे शवागार 24 तासात सुरू करा अन्यथा लोक रस्त्यावर येतील असा इशारा आमदार विजय सरदेसाई यांनी दिला असला तरी या शवागाराची अजूनही चाचणी न झाल्याने ते सुरू करण्यास किमान दोन आठवडे जाणार आहेत. सध्या या शवागाराची चाचणी जीएसआयडीसी कडून चालू असून ती रावीवरपर्यत पूर्ण होण्याची शक्यता आहे . त्यानंतर पुढचे दोन आठवडे हे शवागार व्यवस्थित चालते की नाही हे इस्पितळातील डॉक्टर तपासून पाहणार आहेत. ही चाचणी पूर्ण झाल्याशिवाय या शवागारात मृतदेह ठेवणे शक्य नाही अशी माहिती डॉ. मधू घोडकीरेकर यांनी दिली. वास्तविक हे शवागार फेब्रुवारी महिन्यात सुरू होणार होते पण लॉकडाऊनमुळे त्याची चाचणीच होऊ न शकल्याने ते सुरू होऊ शकले नाही असे त्यांनी सांगितले.