पणजी : राज्यात येत्या महिन्यात म्हणजे जानेवारीत एकूण चार लाख कोरोना चाचण्या पूर्ण होणार आहेत. सध्या ३ लाख ९४ हजारांहून जास्त कोरोना चाचण्या झाल्या आहेत. राज्याच्या विविध ग्रामीण भागांमध्ये अजुनही चारशे कोरोना रुग्ण आहेत. आरोग्य खात्याची यंत्रणा आता दिवसाला हजार ते बाराशे एवढ्याच कोरोना चाचण्या करते. तरी देखील एकूण ३ लाख ९४ हजारहून अधिक कोरोना चाचण्या आतापर्यंत झालेल्या आहेत. सोमवारी कोरोना चाचण्यांची एकूण संख्या ३ लाख ९३ हजार ५८७ होती. त्यात दुपारपर्यंत आणखी पाचशे चाचण्यांची भर पडली. गेल्या आठ दिवसांत साधारणत: तेरा हजार कोरोना चाचण्या झाल्या.
राज्यात सध्या साडेनऊशेहून अधिक सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. यापैकी चारशे कोरोना रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत. आरोग्य खात्याच्या रोजच्या कोरोना बुलेटिनमध्ये विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या क्षेत्रातील रुग्णांविषयी माहिती दिली जाते. नवीन किती रुग्ण आढळले हे त्यावरून कळून येते. वाळपईच्या कम्युनिटी हेल्थ सेंटरच्या क्षेत्रात बहुतांश ग्रामीण भागच येतो. तिथे कमी म्हणजे सहा रुग्ण आहेत पण बेतकी खांडोळा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या क्षेत्रात १८ कोरोना रुग्ण आहेत. तिथेही बहुतांश ग्रामीण भाग येतो.
पेडणेतील कासारवर्णे भागात पाच कोरोना रुग्ण आहेत तर शिवोली आरोग्य केंद्राच्या क्षेत्रात २५ कोरोना रुग्ण आहेत. मये आरोग्य केंद्राच्या क्षेत्रात अजुनही चार सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. हळदोणा परिसरात बारा रुग्ण आहेत. कोलवाळच्या क्षेत्रातही ग्रामीण भाग येतो, तिथे १३ कोरोना रुग्ण आहेत. साखळी कम्युनिटी हेल्थ सेंटरच्या क्षेत्रात १९ तर पेडणे व परिसरात २४ कोरोनाग्रस्त आहेत. दक्षिण गोव्यातील काणकोण कम्युनिटी हेल्थ सेंटरच्या क्षेत्रात २८ तर बाळ्ळी आरोग्य केंद्राच्या क्षेत्रात ११ कोविड रुग्ण आहेत.
मडकई आरोग्य केंद्राच्या क्षेत्रात १६ तर सांगे येथील आरोग्य केंद्राच्या क्षेत्रात २९ कोरोनाग्रस्त आहेत. हे बहुतांश भाग ग्रामीण गोव्यात येतात. शिरोडा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या क्षेत्रात पूर्वी कोरोनाग्रस्तांची संख्या घटली होती. आता संख्या ३२ पर्यंत वाढली आहे. केपे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या क्षेत्रात ४१ तर कुडचडे कम्युनिटी हेल्थ सेंटरच्या क्षेत्रात अजुनही २८ कोरोनाग्रस्त आहेत. धारबांदोडा भागात अजुनही ११ कोरोनाग्रस्त आहेत.