पणजी : राज्यात दर चोवीस तासांत 84 कोविडग्रस्त आजारातून बरे होतात असे सरकारी आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. गेल्या दहा दिवसांत एकूण 2 हजार 11 कोविडग्रस्त आजारातून बरे झाले. त्यांची स्थिती सुधारली. आतापर्यंत कोविडमुळे 55 व्यक्तींचे बळी गेले ही मात्र मोठ्या चिंतेची गोष्ट गोव्यात झाली आहे. तीन प्रकरणी मृतदेहांची शवचिकित्सा केल्यानंतर त्या व्यक्तीला कोविड होता हे स्पष्ट झाले.
राज्यात रोज सरासरी 2 हजार 200 व्यक्तींच्या कोविड चाचण्या केल्या जातात. आतापर्यंत एकूण 1 लाख 36 हजारहून जास्त व्यक्तींच्या कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत. यात पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींची संख्या सुमारे सात हजार आहे. मात्र, या सात हजारांपैकी सुमारे पाच हजार व्यक्ती कोविडमुक्त झाल्या. उर्वरित व्यक्तींपैकी काही जणांवर कोविड इस्पितळात उपचार सुरू आहेत तर काहीजण कोविड निगा केंद्रामध्ये आहेत. सुमारे दीडशे व्यक्ती घरीच क्वारंटाईन झाल्या आहेत.
पंचावन्न व्यक्तींचा उपचारा दरम्यान बळी गेला. यात चाळीस व पन्नास वर्षाहून कमी वयाचेही काही रुग्ण असल्याने स्थिती चिंताजनक मानली जात आहे. जे 55 रुग्ण आतार्पयत दगावले, त्यातील सुमारे 35 एका मुरगाव तालुक्यातील आहेत. आठजण सासष्टी तालुक्यातील आहेत. काहीजण बार्देश व काहीजण तिसवाडीतील आहेत. सत्तरी तालुक्यात दोघांचे, सांगेत एकाचा व फोंडा तालुक्यातही एकाचा कोविडमुळे मृत्यू झाला आहे.
राज्यातील सुमारे साठ जागा अशा आहेत, जिथे कोविडचे रुग्ण आढळले. काही ठिकाणी केवळ एकच व्यक्ती कोविडग्रस्त आढळली. सर्वाधिक समस्या निर्माण झाली ती वास्को रुग्णालयाच्या क्षेत्रत व कुठ्ठाळी आरोग्य केंद्राच्या क्षेत्रत. तसेच चिंबल, साखळी, मडगावच्या आरोग्य केंद्रांच्या तथा रुग्णालयांच्या क्षेत्रतही जास्त कोविडग्रस्त आढळले. कोलवाळ, म्हापसा व पणजी रुग्णालयांच्या क्षेत्रतही कोविडग्रस्तांची संख्या वाढली.
आल्तिनो येथे युवकाचा मृत्यू दरम्यान, पणजीतील आल्तिनो येथील एका 29 वर्षीय युवकाचा मंगळवारी पहाटे कोविडमुळे मृत्यू होण्याची खळबळजनक घटना घडली. पणजीचे महापौर उदय मडकईकर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. दोन दिवसांपूर्वी या युवकाला मडगावच्या कोविड इस्पितळात दाखल करण्यात आले होते. उपचारांदरम्यान त्याला मरण आले. यामुळे पणजीत दु:ख व्यक्त होत आहे. पणजीत आतार्पयत कोविडग्रस्तांची एकूण संख्या 79 झाली आहे. आल्तिनो येथे कोविडचा फैलाव झालेला नाही पण तेथील युवकाचा मृत्यू झाल्याने लोकांमध्ये काहीशी भीती पसरली.