पणजी : ओगस्ट किंवा सप्टेंबर व ओक्टोबर महिन्याच्याही तुलनेत नोव्हेंबरमध्ये कोविडमुळे कमी बळी गेले पण संख्या एकदम कमी नाही. अजून नोव्हेंबर महिना पूर्ण होण्यास सहा दिवस बाकी आहेत. गेल्या चोवीस दिवसांत नोव्हेंबरमध्ये एकूण ८५ व्यक्तींचे कोविडने बळी घेतले आहेत. यात सर्वाधिक ज्येष्ठ नागरिक म्हणजे साठ वर्षांवरील रुग्णांचा समावेश आहे.
सप्टेंबर किंवा ओक्टोबरमध्ये व कोविडमुळे खूपच बळी गेले. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातही जास्त बळी गेले. मात्र दुसऱ््या पंधरवड्यात संख्या खाली आली आहे. १ नोव्हेंबर रोजी कोविडमुळे पाचजण दगावले होते. त्यातही तीन ज्येष्ठ नागरिकांचा समावेश होता. पुन्हा २ नोव्हेंबर रोजी सातजणांचे कोविडमुळे निधन झाले होते. त्यातही पाच ज्येष्ठ नागरिकांचा समावेश होता. शिवाय दोघे ५७ व ५९ वर्षे वयाचे होते. १७ नोव्हेंबर रोजी कोविडने चौघांचा जीव घेतला. त्यात दोघे ज्येष्ठ नागरिक होते व दोघे पंचावन्नहून जास्त वयाचे आहेत.
नोव्हेंबर हा एकमेव असा महिना आहे, जिथे अजूनपर्यंत तीन दिवस असे आले, की त्या तीन दिवसांत एकही बळी गेला नाही. हे तीन दिवस सलग आले नाहीत. २३ नोव्हेंबर रोजी गोव्यात कोविडमुळे एकाचेही निधन झाले नाही. १९ नोव्हेंबर रोजीही गोव्यात कोविडमुळे कुणी दगावले नाही. १४ व १६ नोव्हेंबर रोजी प्रत्येकी फक्त एकाचाच बळी गेला. १२ नोव्हेंबर रोजीही राज्यात कोविडमुळे कुणाचे निधन झाले नाही.
कोविडची लक्षणेदिसल्यानंतरही लोक पूर्वी घरीच राहत होते. तपासणीही करून घेत नव्हते व गोळ्याही घेत नव्हते. शेवटच्या क्षणी इस्पितळात धाव घेत होते. अशा रुग्णांचेच जास्त बळी गेले. मात्र आता स्थिती बदलू लागली आहे. आता रुग्ण अगोदरच उपचार सुरू करतात. चाचणी करून घेतात व डोक्टरांच्या सल्ल्यानुसार गरज पडल्यास अगोदरच इस्पितळात येतात. यामुळे बळींचे प्रमाण थोडे खाली आले आहे. ज्यांचे वय जास्त आहे व ज्यांना अन्य कसले तरी गंभीर आजार आहेत, त्यांनी कोविडबाबत अधिक सतर्क राहणे व काळजी घेणे गरजेचे ठरते.
५६ ज्येष्ठ नागरिक दगावले
गेल्या चोवीस दिवसांत एकूण ५६ ज्येष्ठ नागरिकांचा जीव कोविडने घेतला. साठ, सत्तर व ऐंशी वर्षांवरील हे नागरिक आहेत. बहुतेकजण बांबोळी येथील गोमेको इस्पितळात उपचार घेताना मरण पावले. काहीजण मडगावच्या ईएसआय इस्पितळात मरण पावले. चाळीशीच्या वयोगटातील एक दोघेजण गेल्या चोवीस तासांत कोविडमुळे मरण पावले आहेत. त्यांना अन्य आजारही होते.