पणजी : बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयीन इस्पितळाच्या (गोमेको) कारभारात अजून पूर्ण सुधारणा झालेली नाही व त्यामुळे ऑक्सीजनअभावी कोविड रुग्णांचे जीव जाणे गुरूवारी पहाटेही सुरू राहिले. गुरुवारी पहाटे २ ते ६ या वेळेत आणखी १५ कोविडग्रस्तांचे ओक्सीजनअभावी जीव गेले.
बुधवारची मध्यरात्र उलटून गेल्यानंतर ऑक्सीजनचा पुरवठा कमी पडला. यामुळे पंधरा- सोळा रुग्णांचे मृत्यू झाले. १४७ वॉर्डात ऑक्सीजन कमी पडल्याने रुग्णांचे हाल झाले. ऑक्सीजन फ्लक्च्युएट होत असल्याविषयीचा एक व्हीडीओही काढला गेला आहे. श्रुती चतुर्वेदी यांनी सोशल मिडियावरून एक व्हीडीओही व्हायरल केला आहे.
ऑक्सीजन सिलिंडर संपत आल्यानंतर संबंधित यंत्रणेजे जागे होऊन दुसरा सिलिंडर लावावा लागतो. तो लावला न गेल्याने वेळ वाया जातो व ओक्सीजनअभावी रुग्ण दगावतो. गेले काही दिवस ऑक्सीजनअभावी रुग्ण मरत राहिले आहेत. सरकारने धारणा केली असती तर अनेक कोविडग्रस्तांचे प्राण वाचले असते.
दरम्यान, कोविडग्रस्तांचे जीव गोमेको वाचवू न शकल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने गुरुवारीही तीव्र नापसंती व्यक्त केली. केंद्र सरकारने गोव्याला अतिरिक्त ओक्सीजन कोटा मंजुर करावा, असा आदेश न्यायालयाने दिला व गोव्याच्या यंत्रणेने याबाबत केंद्राकडे त्वरेने पाठपुरावा करावा असेही न्यायालयाने बजावले आहे.