पणजी : दहावीच्या परीक्षेच्या इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत जे दोन प्रश्न समाविष्ट केले गेले आहेत, ते आक्षेपार्हच आहेत. त्याविषयी शालांत मंडळाने चौकशी सुरू करावी व जे कुणी यास जबाबदार आहेत, त्यांच्याविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी प्रदेश भाजपाने केली आहे. सरचिटणीस नरेंद्र सावईकर यांनी प्रवक्ते प्रेमानंद म्हांब्रे यांच्यासोबत सोमवारी येथे पत्रकार परिषद घेतली. काही गोमंतकीय विदेशात जाऊन नोकरी-धंदा करतात ही जागतिक प्रक्रिया आहे.जगात सगळीकडेच असे चालते. केवळ गोव्याबाबतच असे घडतेय असे नव्हे. मात्र तो विषय वेगळा आहे. इंग्रजीच्या व्याकरणाविषयी प्रश्न तयार करताना शिक्षकांनी आक्षेपार्ह असा प्रश्न विचारला. पोर्तुगीज नागरिकत्व बरे असा संदेश शिक्षकाने विद्यार्थ्यांना दिला. गोव्यात रोजगारासाठी फार कमी संधी आहे व त्यासाठी आपण पोर्तुगीज पासपोर्टसाठी अर्ज केला आहे, असा संवाद प्रश्नपत्रिकेमध्ये आहे. गोव्यात भ्रष्टाचार गोमंतकीयांना पिडतोय, अशा अर्थाचाही संवाद आहे. याविषयी भाजपाकडून प्रश्नपत्रिका तयार करणारा शिक्षक व अन्य संबंधित घटक यांचा निषेध केला जात असल्याचे सावईकर यांनी सांगितले.शिक्षण क्षेत्रात अराष्ट्रीय वृत्ती नको.राष्ट्रविरोधी मानसिकता घेऊन काही शिक्षक वावरतात, असा अर्थ प्रश्नपत्रिकेतील संवादातून होतो. अशा प्रकारची मानसिकता शिक्षण क्षेत्रात तरी नको, असे म्हांब्रे म्हणाले. प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी एक प्रक्रिया असते. शालांत मंडळ प्रश्नपत्रिकेसाठी अप्रत्यक्षरीत्या जबाबदार ठरते. जे थेट जबाबदार ठरतात, त्यांची चौकशी केली जावी व कारवाई व्हावी असे म्हांब्रे म्हणाले. आम्ही मुख्यमंत्र्यांसमोरही हा विषय मांडलेला आहे, असे सावईकर म्हणाले. विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी ट्विट करून प्रश्नपत्रिकेतील वादग्रस्त प्रश्नांचे समर्थन केले आहे. कामत यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती. आम्ही त्यांचाही निषेध करतो, असे सावईकर यांनी सांगितले व काँग्रेस पक्षाने याविषयी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी त्यांनी केली.
Coronavirus News: प्रश्नपत्रिकेतील आक्षेपार्ह प्रश्नांबाबत कारवाई हवी, भाजपाची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2020 8:40 PM