पणजी : दिल्लीहून रेल्वेने गोव्यात आलेले आणखी ८ ते १0 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असून, अंतिम अहवालाच्या प्रतीक्षेत आरोग्य खाते आहे. या रुग्णांच्या बाबतीत शिक्कामोर्तब झाल्यानंतर गोव्यातील पॉझिटिव्ह रुग्णसंख्या २६ वर पोहोचेल. राज्याबाहेरून येणारेच पॉझिटिव्ह सापडत असल्याने पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गोव्यात राज्याबाहेरून येणारे कोरोना पॉझिटिव्ह सापडत असल्याने पुन्हा एकदा चिंता वाढली आहे. राज्यात एकाच दिवशी प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. गोवा ग्रीन झोनमध्ये होता, परंतु आता ही रुग्णांची वाढत जाणारी संख्या पाहता रेड झोनमध्ये जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दिल्लीहून आलेल्या ट्रेनमधील ज्या कोचमधील प्रवाशांचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे, त्या कोचमधून प्रवास केलेल्या सर्व प्रवाशांना सरकारच्या संस्थात्मक क्वारंटाइन केंद्रात निगराणीखाली ठेवले असून, १४ दिवस त्यांना तेथे ठेवले जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. राज्यात दिवसेंदिवस पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. रेल्वेतून आलेल्या आणि ३ प्रवाशांचा कोरोना तपासणी अहवाल रविवारी सकाळी पॉझिटिव्ह आला. यात एका महिला प्रवाशाचाही समावेश आहे.
शनिवारी दिल्लीहून आलेल्या रेल्वेतून मडगाव रेल्वे स्थानकावर उतरलेल्या तीन प्रवाशांची रॅपिड टेस्टमध्ये पॉझिटिव्ह चाचणी आली होती. गोमेकॉत पुन्हा तपासणी केली असता यावर शिक्कामोर्तब झाले. या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. या तिघांनाही मडगाव येथील कोविड इस्पितळात हलविण्यात आले आहे. दिल्ली-गोवा रेल्वेतून आलेल्या आणखी ५६ प्रवाशांच्याही चाचण्या करण्यात आल्या असून, अहवाल प्राप्त व्हायचा आहे. दरम्यान, आणखी ८ ते १0 रुग्ण टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आले.
आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिलेल्या माहितीनुसार दक्षिण गोव्यातील मडगांवच्या इस्पितळात आतापर्यंत ५00 चाचण्या करण्यात आल्या. परराज्यात अडकलेले गोमंतकीय आता परतू लागले असल्याने तपासणी व्यवस्था आणखी मजबूत करण्याची वेळ आली आहे. आरोग्य खाते एमडी आणि एमएससी इन मायक्रोबायोलॉजी डॉक्टरांची तातडीने भरती करणार आहे. ऑस्पिसियो, ऑझिलो इस्पितळात आणखी ५ टेस्टिंग मशिन बसविली जातील तसेच फोंडा येथील उप जिल्हा इस्पितळातही ३ मशिने बसविली जातील. दरम्यान, पुढील तीन ते चार तासात आणखी एक रेल्वे गाडी दिल्लीहून गोव्यात येणार आहे. ती काय घेऊन येईल याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.