पणजी : ग्रीन झोन व कोरोनामुक्त म्हणून ज्याचा देशभर गवगवा झाला, त्या गोव्यात कोरोनाचा धुमाकूळ सुरू झाला आहे. सोमवारी चौदा नवे कोरोना रुग्ण सापडले. त्यामुळे गोव्यात कोरोना रुग्णांची एकूण संख्या ३६ झाली.गोव्यात आता रोज सरासरी एक हजार कोविड चाचण्या होत आहेत. फक्त सरकारच्या गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात प्रयोगशाळा आहे. तिथे अंतिम चाचणी केली जाते. आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी दिलेल्या माहितीनुसार परप्रांतांमधून ज्या रेल्वेगाड्या येऊ लागल्या आहेत, त्यातून कोरोना रुग्ण येत आहेत. त्यामुळे गोमंतकीयांना काळजी घ्यावीच लागेल. गोव्यात सामाजिक प्रसार होणारच नाही असे म्हणून निर्धास्त राहता येत नाही.गोव्यात चार दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या ३६ झाली. तसेच दोन दिवसांत २३ नवे कोरोना रुग्ण सापडले व हे सगळे परप्रांतीय आहेत. गोव्यात उद्योगांमध्ये कारवार व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कामगार आणण्यासाठी सरकारने परवानगी दिल्यानंतर कामगार येऊ लागले. फार्मा कंपनींनाही मनुष्यबळाची गरज होती.या मनुष्यबळामध्ये तिघे कोरोना रुग्ण सापडले. याशिवाय दिल्लीहून दोन रेल्वेगाड्या गोव्यात आल्या. मुंबईहून दोन रेल्वेगाड्या आल्या. त्यातून आलेल्या दीड हजार प्रवाशांमध्ये पंधरा कोरोना रुगण सापडले. यामुळे आरोग्य यंत्रणाही हैराण झाली आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या आठवड्यापासून राजधानी एक्सप्रेस गोव्यात येणार नाही. गोव्यात परप्रांतांमधून येणाऱ्या प्रत्येक रुग्णाकडून शुल्क आकारून चाचणी केली जाते.गोव्यात प्रवासी रेल्वे येणे त्वरित बंद करायला हवे. जे गोमंतकीय देशाच्या विविध भागांत अडकले होते, त्यापैकी बहुतेकांनी गोवा गाठला आहे. ते गोव्यात पोहोचले. आता अजूनही मुंबई व अन्यत्र कुणी गोमंतकीय अडकलेले असतील तर त्यांना रस्तामार्गे बसद्वारे सरकारने गोव्यात आणावे. गोव्यात फक्त मालवाहू रेल्वे येऊ द्या, प्रवाशांनी भरलेली रेल्वे कोणत्याच स्थितीत नको हे मी मुख्यमंत्र्यांसमोरही मांडले आहे.''- मायकल लोबो, विज्ञान व तंत्रज्ञानमंत्री
CoronaVirus News : गोव्यात कोरोनाचे रुग्ण वाढले; सोमवारी १४ नवे, एकूण ३६
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 4:07 AM