पणजी : राज्यात गेल्या ५७ दिवसांमध्ये कोविडमुळे एकूण २४५ नागरिकांचे जीव गेले आहेत. विविध वयोगटातील हे नागरिक आहेत. एका नोव्हेंबर महिन्यातील २६ दिवसांत ७६ व्यक्तींना आपला जीव कोरोनामुळे गमवावा लागला.
लोकांनी कोविडची लक्षणे दिसताच लगेच डोक्टरांशी संपर्क साधणे किंवा इस्पितळात जाऊन दाखल होणे गरजेचे आहे. गोमेकोच्या मते अजुनही अनेकजण घरीच राहतात. ताप आला, सर्दी झाली किंवा हगवण लागली तरी घरीच राहतात किंवा डोक्टरांच्या संपर्कात येणे टाळतात. श्वासोश्वासाचा मोठा त्रास होऊ लागला की, मग इस्पितळात धाव घेतात. अशावेळी लोकांचे जीव वाचविणे कठीण जाते असे काही डोक्टरांचे म्हणणे आहे. विशेषत: ज्यांचे वय जास्त झाले आहे व ज्यांना अन्य काही आजार आहेत, त्यांनी कोविडची लक्षणे दिसताच उपचार सुरू करून घ्यायलाच हवेत. पूर्वीप्रमाणे आता बळींचे प्रमाण जास्त नाही पण नोव्हेंबर महिन्यात सुद्धा शंभरच्या जवळ बळींची संख्या पोहचू लागली आहे हे चिंताजनक आहे. गेल्या २६ दिवसांत जे ७६ बळी गेले, त्यात पन्नास वर्षांहून जास्त वयाचेच बहुतेक रुग्ण आहेत. त्यातीलही काहीजणांना मृतावस्थेतच इस्पितळात आणले गेले होते तर काहीजण इस्पितळात आल्यानंतर चोवीस तासांत दगावले.
२० दिवसांत ११५ बळी
ओक्टोबर महिन्यात कोविड बळींची संख्या जास्त होती. दि. १ ओक्टोबरला राज्यात एकूण बारा व्यक्ती कोविडमुळे मरण पावल्या. त्या दिवशी बळींची एकूण संख्या ४४० होती. म्हणजे जूनपासून दि. १ ओक्टोबरपर्यंत ४४० व्यक्ती दगावल्या. दि. २० ओक्टोबरला बळींचे प्रमाण एकूण ५५५ पर्यंत पोहचले. याचाच अर्थ असा की, ओक्टोबरच्या केवळ वीस दिवसांत एकूण ११५ व्यक्तींचा जीव कोविडने घेतला. २० ओक्टोबरला चोवीस तासांत सहाजण दगावले.
दि. ३० ओक्टोबरला बळींचे एकूण प्रमाण ६०२ झाले. त्या दिवशी चोवीस तासांत पाचजणांचा जीव गेला. दि. १ नोव्हेंबरला एकूण बळींची संख्या ६०९ होती. दि. ६ नोव्हेंबरला संख्या ६३३ झाली. दि. १७ नोव्हेंबरला संख्या ६६७ झाली. त्या दिवशी चोवीस तासांत चार रुग्ण दगावले होते. दि. २६ नोव्हेंबरला कोविड बळींची एकूण संख्या ६८५ झाली. नोव्हेंबर महिना संपण्यास आता फक्त तीन दिवस बाकी आहेत. अशावेळी नोव्हेंबरमधील बळींची संख्या ७६ आहे.