म्हापसा : गंगानगर-म्हापसा येथे कोरोनाचा रुग्ण आढळल्याने सावधगिरी म्हणून हा प्रभाग प्रशासनाकडून बंद केला आहे. याठिकाणी प्रवेश मार्गावर अडथळे घालून मार्ग बंद करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे आज बुधवारी गंगानगरमधील एकूण १९८ जणांचे कोरोना स्वॅब चाचणी घेतली असून त्यांचा अहवाल येणे बाकी आहे. अहवालानंतर प्रशासनाकडून पुढील पाऊल उचलण्यात येईल.
गोमकॉत काम करणा-या एका नाभिकाचा (न्हावी) कोरोना चाचणी अहवाल मंगळवारी सायंकाळी पॉझिटीव्ह आला व त्याला ताबडतोब शिरोडा येथील कोविड निगा केंद्रात हलविले. ही व्यक्ती गंगानगर, खोर्ली-म्हापसा या परिसरात असल्याने खबरादारी म्हणून आज बुधवारी दिवसभर आरोग्य खात्यातर्फे गंगानगर , खोर्ली भागातील रहिवाशांचे थ्रोट स्वॅब नमुने घेण्यास सुरूवात केली. आतापर्यंत आरोग्य खात्याने २५० जणांची ओळख पटविली असून त्यातील १९८ जणांचे नमुने घेतले आहेत. उद्या उर्वरितांचे नमुने घेतले जातील. खोर्ली येथील नागरी आरोग्य दवाखान्यात या लोकांची तपासणी करण्यात केली. त्यांना कदंब बसमधून नेण्यात आले होते.
यावेळी जोशुआ डिसोझा यांनी गंगानगर येथे जाऊन स्थितीचा आढावा घेतला व प्रशासकीय अधिकारी तसेच आरोग्य यंत्रणेसोबत चर्चा करून उपाययोजनाबाबत चर्चा केली. पुढील चार दिवस परिसरातील लोकांना बाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला असून अहवालानंतर पुढील दिशा ठरविली जाणार असल्याचे स्थानिक आमदार जोशुआ डिसोझा यांनी सांगितले.
जोशुआ डिसोझा म्हणाले की, म्हापसा मतदारसंघात मंगळवारी (दि.२३) एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला. त्यामुळे पोलिसांनी खबरदारी म्हणून या परिसरातील प्रवेशद्वार बंद करण्यात आला आहे. तसेच सर्व रहिवाशांना घरामध्येच थांबण्याची विनंती केली गेली आहे. याशिवाय परिसरात एकूण २५० जणांची ओळख पटविली असून त्यापैकी १९८ जणांचे स्वॅब चाचणी घेतली आहे.
दरम्यान, सध्या गंगानगरमध्ये एक कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्याने स्थानिक , आजूबाजूच्या पसिरात व शहरात एकंदर भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. या परिसरात मोठा पोलीस फौजफाटा नियुक्त केला आहे.