सदगुरू पाटीलपणजी : महाराष्ट्रातून जे प्रवासी गोव्यात येतात, केवळ त्यांच्यासाठीच वेगळी व जास्त कडक प्रक्रिया गोव्यात लागू करण्याचा विचार अखेर बुधवारी गोवा मंत्रिमंडळाने मागे घेतला. सर्वासाठीच वेगळी प्रक्रिया लागू केली जाईल, केवळ मुंबईतील किंवा महाराष्ट्रातील लोकांसाठी नव्हे असे सरकारने बुधवारी स्पष्ट केले. गोव्यात आतापर्यंत कोरोनाचे एकूण 68 रुग्ण सापडले व त्यापैकी 21 रुग्ण उपचारानंतर ठीक झाले व त्यांना इस्पितळातून डिस्चार्ज दिला गेला. मात्र गोव्यातील एकूण कोरोना रुग्णांमध्ये 90 टक्के रुग्ण हे महाराष्ट्रातील आहेत. यामुळे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोव्यात येणा-या महाराष्ट्रातील प्रवाशांना यापुढे अधिक कडक व वेगळी प्रक्रिया लागू केली जाईल, असे विधान केले होते.केंद्रीय रेल्वे मंत्रालयाशी आपले बोलणे सुरू असल्याचेही त्यांनी म्हटले होते. मात्र बुधवारी मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेतली. त्यावेळी गोव्यातील कोरोनाविषयक स्थिती, सरकारची उपाययोजना, गोव्यात रोज येणा-या प्रवाशांची संख्या हे सगळे विचारात घेतले गेले. बरीच चर्चा झाली, सर्व मंत्र्यांची मते जाणून घेतली गेली आणि महाराष्ट्रातील लोकांसाठी वेगळी प्रक्रिया नको, सर्वच प्रवाशांसाठी वेगळी व कडक प्रक्रिया लागू करूया असे बैठकीत ठरले.मुख्यमंत्री सावंत यांनी यानंतर पत्रकार परिषदही घेतली व सविस्तर माहिती दिली.गोव्यात देशभरातून रोज चार हजार प्रवासी येतील, असे आम्हाला वाटले होते. प्रत्यक्षात हजार बाराशेच येतात. गोव्यात रेल्वेची संख्या मर्यादित आहे. विमानेही कमी येतात. रोज एक हजार व्यक्तींची चाचणी करण्याची गोव्याची क्षमता आहे, त्यामुळे आम्ही गोव्यात येणा-या प्रत्येकाची कोरोना चाचणी करू. महाराष्ट्रातील प्रवाशांना म्हणून वेगळी प्रक्रिया नसेल. जो प्रवासी नो कोरोना प्रमाणपत्र घेऊन येईल, त्याची चाचणी केली जाणार नाही. अशा प्रकारचे प्रमाणपत्र 48 तास अगोदर प्रयोगशाळेतून घेतलेले असावे. प्रमाणपत्र नसलेल्या प्रत्येक प्रवाशाची चाचणी करू व ती नकारात्मक आली तर त्यास होम क्वारंटाईनचा पर्याय दिला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
Coronavirus News: महाराष्ट्रासाठी वेगळी प्रक्रिया करण्याचा विचार गोवा सरकारकडून रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2020 5:04 PM