पणजी : पंधरा लाख लोकसंख्या असलेल्या गोव्यात पर्यटक तसेच परराज्यातून येणा-या प्रवाशांची संख्या लक्षणीय आहे. २२ मार्चपासून आतापर्यंत १३,००० व्यक्तींच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या असून यामध्ये ६६ पॉझिटिव्ह आढळले. यातील १९ रुग्ण बरे होऊन ४७ पॉझिटिव्ह बाकी राहिले आहेत.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा असा दावा आहे की, पुढील आठ दिवसात हे पॉझिटिव्ह रुग्णही बरे होऊन घरी जातील. एका प्रश्नावर सावंत म्हणाले की, राज्य सरकारच्या विनंतीवरुन केंद्राने मर्यादित ट्रेन गोव्यात पाठविल्या परंतु देशात सर्वत्र बहुतांश ट्रेन सुरु होत आहेत. त्यामुळे विमाने किंवा ट्रेन यांना गोव्यात मज्जाव करता येणार नाही.
दाबोळी विमानतळावर एरव्ही दररोज ९१ विमाने येतात. पुढील काळात मोठ्या प्रमाणात प्रवाशी येणार असल्याने सर्व सज्जता सरकारने ठेवली आहे. कोविड इस्पितळाची क्षमता २०० खाटांची आहे. गरज पडल्यास आणखीही पर्याय आम्ही तयार ठेवले आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
गोवा हे एकमेव राज्य असे आहे की राज्यात प्रवेश करणा-या प्रत्येकाची आम्ही कोविड चाचणी केली. होम क्वारंटाइन केल्या जाणा-या ९० टक्के व्यक्ती मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करतात, असे त्यांनी सांगितले. मडगांवच्या कोविड इस्पितळात २०० खाटांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढल्यास पर्यायी व्यवस्थाही सज्ज ठेवलेली आहे, असा दावा त्यांनी केला.
दरम्यान, गोव्याच्या गावा-गावांमध्ये क्वारंटाइन केंद्रांना विरोध होऊ लागला आहे. ही केंद्रे आमच्या गावात नकोच, अशी भूमिका ग्रामस्थ घेत आहेत. ठिकठिकाणी ग्रामस्थ उठाव करु लागले आहेत. गेल्या आठवड्यात कांदोळी येथे मध्यरात्रीच्या सुमारास लोक जमले आणि गावात क्वारंटाइन करण्यास विरोध केला त्यानंतर शनिवारी दक्षिण गोव्यात बेताल भाटीतही असाच प्रकार घडला. राज्यात यापुढे प्रवाशांची संख्या वाढणार आहे या गर्दीमुळे गावागावांमधील हॉटेलांमध्ये क्वारंटाइन करावे लागेल त्यामुळे पुढील काही दिवसात या विरोधाची तीव्रता आणखी वाढणार आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेसमोरही पेच निर्माण झालेला आहे.
परराज्यांमधून तसेच विदेशातून गोव्यात येणा-या प्रवाशांना क्वारंटाइन करण्यासाठी पर्यटन विकास महामंडळाच्या रेसिडेन्सी तसेच काही खाजगी हॉटेल्स व अन्य आस्थापने सरकारने घेतलेली आहेत. मात्र प्रवाशांना तेथे पाठवल्यानंतर स्थानिक लोक विरोध करतात. शनिवारी बेतालभाटी येथे एका हॉटेलमध्ये क्वारंटाइनसाठी नेलेल्या आठजणांना स्थानिकांनी अडवून मज्जाव केला.