पणजी: प्रत्येक कोविडग्रस्ताला कोविडची लागण कशी झाली ते स्पष्ट झालेले आहे. मी स्थितीचा आढावा घेतला व त्यावेळी प्रत्येक कोविडग्रस्त व्यक्तीच्या कोविडचा कळून आला. त्यामुळे गोव्यातील कोविडची लागण हा सामुहिक संसर्ग नव्हे, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बुधवारी दिले.
गोव्यातील हवेत कोविडचा व्हायरस नाही. सामुहिक पद्धतीने कोविडचा संसर्ग झाला नाही. मी माङो यापूर्वीचे विधान दुरुस्त करत आहे. सामुहिक संसर्ग गोव्यात सुरू नाही. एक व्यक्ती दुस:या कोविडग्रस्त व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर कोविडची लागण झाली आहे. एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला लागण झाल्यास त्यास सामुहिक संसर्ग म्हणता येत नाही.
एकही रुग्ण असा नाही, जो घरातच होता व तो कुणाच्याच संपर्कात आलेला नसताना त्याला कोविडची लागण झाली. गोव्यात असे एक देखील उदाहरण नाही. कारण गोव्यातील हवेत कोविड नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. आपण आढावा घेतला तेव्हा प्रत्येक रुग्णाच्या संसर्गाचे मुळ कळून आले. साखळीत कोविडची लागण कशी झाली तेही स्पष्ट झाले. माजी मंत्री डायलसिस करण्यासाठी जात होते, तिथे त्यांना कोविडची लागण झाली असाही निष्कर्ष मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत मांडला.
आमदार सुरक्षित-
दरम्यान, कुंकळ्ळीच्या भाजप आमदाराला कोविडची लागण झाली. त्या आमदारासोबत भाजपचे अन्य नऊ आमदार तुम्हाला भेटले होते, त्यामुळे सर्वाची कोविड चाचणी करण्याची गरज आहे काय असे पत्रकारांनी विचारले असता, ते आठ दिवसांपूर्वी भेटले होते. त्यावेळी आम्ही सर्वानी सोशल डिस्टनसींगचे पालन केले होते, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. जर कुणाला यापुढे गरज वाटली तर व्यक्तीगत स्तरावर कुणीही स्वत:ची कोविड चाचणी करून घेऊ शकतो, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले आहे.