मडगाव: 23 नोव्हेंबरपर्यंत गोव्यात दररोजच्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची बरे होण्याची संख्या अधिक होती. मात्र, 24 नोव्हेंबरपासून त्यात बदल व्हायला लागला असून गेल्या सात दिवसात पॉझिटिव्ह रुग्ण जास्त आणि बरे होणाऱ्यांची संख्या कमी असे चित्र दिसू लागले.
22 रोजी गोव्यात 78 पॉझिटिव्ह आढळून आले होते तर 167 रुग्ण बरे झाले होते. 23 रोजी हे प्रमाण 75 आणि 104 असे होते. मात्र 24 तारखेपासून हे प्रमाण बदलू लागले असून 24 रोजी हे प्रमाण 167 (पॉझिटिव्ह) आणि 85 (बरे झालेले), 25 रोजी 161-61, 26 रोजी 148- 111, 27 रोजी 156- 152, 28 रोजी 198- 163 तर 29 रोजी 115- 135 असे होते. पण, हे प्रमाण वाढले तरी भीतीदायक नसल्याचे वैद्यकीय क्षेत्रांतील तज्ज्ञ सांगत आहेत. कारण कोव्हिड पॉझिटिव्ह रुग्ण यापूर्वी कमी आढळल्याने आता बरे होणाऱ्याची संख्या कमी दिसत असल्याचे सांगितले जात आहे.
याबाबत बोलताना आयएमएचे पाढाधिकारी डॉ. शेखर साळकर म्हणाले, पॉझिटिव्ह रुग्ण कोव्हिडमधून बरा होण्यासाठी 10 दिवसांचा कालावधी लागतो. मागच्या आठवड्यात कोव्हिड रोगातून बरे होणाऱ्यांची संख्या कमी दिसू लागण्यामागचे कारण म्हणजे त्याच्या दहा दिवसांपूर्वी कमी रुग्ण आढळून आले, असे म्हणावे लागेल. आता जर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असेल आणि दहा दिवसांनी बरे होणाऱ्यांचा संख्येत वाढ दिसून येणार आहे .
सध्या गोव्यात रुग्ण काही प्रमाणात वाढलेले दिसतात त्यामागचे खरे कारण आता चाचण्या वाढल्यामुळे अशी माहिती डॉ. उत्कर्ष बेतोडकर यांनी दिली. मध्यंतरी गोव्यातील कोव्हिड चाचण्यांचे प्रमाण प्रतिदिन सरासरी 1000 पर्यंत होते ते आता 2000 वर आले आहे. त्यामुळेच हा बदल दिसतो.
रविवारच्या आकडेवारी प्रमाणे गोव्यात सक्रिय कोव्हिड रुग्णांची संख्या 1327 इतकी होती. मडगाव येथे 109, फोंडा येथे 104 तर पर्वरी केंद्रावर 102 नवीन रुग्ण आढळून आले होते. पणजीत 82, चिंबेल येथे 68 तर वास्को 67 रुग्ण आढळून आले. रविवारी डिचोली येथील एका 72 वर्षीय रुग्णांचे निधन झाले. जागच्या 7 दिवसात गोव्यात कोव्हिडमुळे एकूण 10 जणांना मृत्यू आला. रविवारी 115 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले त्यातील 7 जण बाहेरून आलेले प्रवासी होते.