पणजी : गोव्यात येत्या 1 जूनपासून सगळी रेस्टॉरंट्स सुरू करावीत, असा सरकारचा विचार आहे. राज्य सरकार स्वत:ची एसओपी तथा प्रक्रिया येत्या 30 रोजी तयार करील व 1 जूनपासून रेस्टॉरंट्स सुरू करण्यास मान्यता देईल. फक्त रेस्टॉरंटमध्ये सामाजिक अंतराची अट पाळावी लागेल. अशा प्रकारची पद्धत लागू करून रेस्टॉरंट्स सुरू करण्यास मुख्यमंत्री प्रमोद सावंत अनुकूल आहेत.मंत्रिमंडळाची बुधवारी बैठक झाली. विज्ञान व तंत्रज्ञान खात्याचे मंत्री मायकल लोबो यांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्र्यांनी रेस्टॉरंट्स व बार देखील सुरू करण्याबाबत सहमती दाखवली आहे. सगळे व्यवहार राज्यात सुरू होत आहेत. अशावेळी रेस्टॉरंट्स सुरू करण्यासही मान्यता द्यावी अशी विनंती मंत्री लोबो यांनी मुख्यमंत्री सावंत यांना केली होती. मुख्यमंत्री त्यासाठी तयार झाले. लॉकडाऊनचा चौथा टप्पा येत्या 30 मे रोजी संपुष्टात येईल. त्यानंतर राज्य सरकार स्वत:ची एसओपी लागू करून रेस्टॉरंट्स व बारही सुरू करण्यास मान्यता देईल, मुख्यमंत्र्यांनी तसे आश्वासन दिले असल्याचे मंत्री लोबो यांनी स्पष्ट केले.जर आम्ही बार व रेस्टॉरंट्स सुरू करू दिले नाही तर गोव्यात बेरोजगारी आणखी वाढेल. बेकारीत भर पडेल. यावर उपाय म्हणून आम्ही रेस्टॉरंट्स प्रथम सुरू करण्यासाठी देणार आहोत. रेस्टॉरंटमध्ये अनेकांना नव्याने काम करण्याची संधी मिळेल. रेस्टॉरंटच्या मालकांनाही दिलासा मिळेल. याचप्रमाणो राज्यातील चहाची छोटी हॉटेल्स देखील सुरू करण्यास मान्यता द्यावी, अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांसमोर ठेवली असल्याचे लोबो यांनी सांगितले. तारांकित हॉटेल्स सुरू करायची की नाही ते केंद्रीय गृह मंत्रालय ठरवील. त्याविषयीचा निर्णय आम्ही घेऊ शकत नाही, असे मंत्री लोबो म्हणाले. टुरिस्ट टॅक्सी, रेन्ट अ कार, बाईक, वॉटर स्पोर्टस व्यावसायिक यांचे विविध परवाने नूतनीकरण करण्याची मुदत टळून गेली, पण त्यांना दंड ठोठावला जाणार नाही. त्यांना मुदतीनंतरही परवान्यांचे नूतनीकरण करू दिले जाईल. सरकारने तशी सूचना वाहतूक खात्याला केल्याचे लोबो यांनी सांगितले.
Coronavirus News: 'या' राज्यात रेस्टॉरंट्स 1 जूनपासून सुरू होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2020 5:08 PM