वास्को: दक्षिण गोव्यात असलेल्या झुआरीनगर झोपडपट्टीत दोन दिवसापूर्वी पाच जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समजल्यानंतर याचा फैलाव रोखण्यासाठी साकवाळ ग्रामपंचायतीने याभागात राहणा-या नागरिकांना सात दिवस लॉकडाऊन करण्याची विनंती केली होती.
साकवाळ पंचायतीने येथील नागरिकांना विनंती केल्यानंतर शनिवारी (दि. २७) या पंचायत क्षेत्रात येणा-या उपासनगर येथील ‘हाऊसिंग बोर्ड कॉलनी’ ते झुआरीनगर येथील ‘मईएस कॉलेज’ या परिसरातील नागरिक स्वेच्छेने लॉकडाऊनमध्ये सहभागी झाल्याचे दिसून आल्याने याभागात शनिवारी शुकशुकाट दिसून आला.
झुआरीनगर झोपडपट्टीत १२ हजाराहून जास्त लोक राहत असल्याचा अंदाज असून येथे राहणा-या ५ जणांना दोन दिवसापूर्वी कोरोना विषाणूची बाधा झाल्याचे उघड झाले होते. सदर झोपडपट्टीत कोरोना विषाणूचा फैलाव झाल्यास येथे तसेच परिसरात मोठा धोका निर्माण होण्याची भीती नंतर नागरिकांकडून व्यक्त करण्यास सुरवात झाली.
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी काय पावले उचलवावी याबाबत चर्चा करण्यासाठी साकवाळ पंचायत समितीने शुक्रवारी खास बैठक घेतली. यानंतर सदर पंचायतीने कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी साकवाळ पंचायतीच्या हद्दीत राहणा-या नागरिकांना शनिवार पासून सात दिवस स्वत:च्या मर्जीने लॉकडाऊनमध्ये सहभागी होण्याची विनंती करण्याचे ठरविले व त्याबाबत पावले उचलली.
साकवाळ पंचायत समितीच्या सदस्यांनी कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी घेतलेल्या या निर्णयाला याभागात राहणा-या नागरिकांनी पाठींबा दिल्याचे शनिवारी दिसून आले. झुआरीनगर झोपडपट्टीत व परिसरात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी साकवाळ पंचायतीत येणा-या उपासनगर येथील ‘हाऊसिंग बोर्ड कॉलनी’ ते झुआरीनगर येथील ‘एमईएस कॉलेज क्षेत्रातील’ नागरिकांना स्वत:च्या मर्जीने लॉकडाऊनमध्ये सहभागी होण्याची विनंती केल्यानंतर शनिवारी या परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले. यामुळे शनिवारी सदर परिसरातील ९५ टक्केहून जास्त दुकाने, विविध आस्थापने, भाजी व इतर मार्केट बंद असल्याचे दिसून आले.
या परिसरातील औषधालय व एक - दोन किरकोळ किराणा दुकाने वगळता सर्वच काही बंद असल्याची माहीती याभागात राहणा-या सूत्रांनी दिली. तसेच जास्तित जास्त नागरिकांनी लॉकडाऊनमध्ये सहभागी होऊन घरात राहण्यास पसंत केल्याने यापरिसरात शनिवारी सकाळी शुकशुकाट दिसून आला. या लॉकडाऊनबाबत अधिक माहिती घेण्यासाठी साकवाळ पंचायतीच्या प्रभाग ७ चे पंच सदस्य सतीश पडवळकर यांना संपर्क केला असता लोकांनी त्यांच्या मर्जीने सर्वांच्या हीतासाठी लॉकडाऊन मध्ये सहभागी होऊन उत्तम कार्य केलेले असल्याचे सांगितले.