पणजी : उत्तर गोव्याचे लोकसभा खासदार व केंद्रीय आयुष मंत्रालयाचे मंत्री श्रीपाद नाईक यांची कोविड चाचणी बुधवारी पॉझिटिव्ह आली आहे. नाईक यांच्यासोबत त्यांच्या पत्नीलाही कोविडची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. नाईक सायंकाळी दिल्लीला जाणार होते, पण कोविड अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांनी दिल्ली दौरा रद्द करून घरीच आयसोलेशनमध्ये राहिले आहेत.
श्रीपाद नाईक यांनी दीड महिन्यापूर्वीही कोविड चाचणी करून पाहिली होती. त्यांच्या अन्य कुटुबीयांनीही कोविड चाचणी करून घेतली होती. पण त्यावेळी त्यांच्या घरातील कुणीच कोविड पॉझिटिव्ह आढळले नव्हते. श्रीपाद नाईक यांच्या मूळगावी व एकूणच मडकई मतदारसंघातील काही भागात कोविडचे रुग्ण यापूर्वी आढळले आहेत. आता चक्क श्रीपाद नाईक यांनाच कोविडची लागण झाल्याने नाईक यांच्या संपर्कात आलेल्या इतर व्यक्तींना थोड्या गोंधळल्या आहेत. त्या व्यक्तींनीही स्वत:ची कोविड चाचणी करून घेणो सुरू केले आहे.
दरम्यान, आपली कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली पण आपल्याला कोणतीही लक्षणे नाहीत. आपण ठीक आहे. आपण घरीच आयसोलेशनमध्ये आहे, गेले काही दिवस आपल्या संपर्कात ज्या व्यक्ती आल्या त्यांनी कोविड चाचणी करून घ्यावी व आवश्यक ती खबरदारीही घ्यावी, असे आवाहन स्वत: श्रीपाद नाईक यांनी केले आहे. नाईक यांनी सायंकाळी तसे ट्विट केले.
गोव्यात कोविड रुग्णसंख्या वाढत आहे. बुधवारी 480 नवे कोविडग्रस्त आढळले. यामुळे सक्रिय कोविड रुग्णांची संख्या 3194 झाली आहे. तिघा कोविडग्रस्तांचा मृत्यू झाला आहे व यामुळे कोविडमुळे मृत्यू झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 89 इतकी झाली आहे.