पणजी : राज्यात गेल्या 20 दिवसांत कोरोनाचा एकही नवा कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेला नाही. याबाबत सरकार समाधानी बनले आहे. तरीही परप्रांतांमधून जे कुणी आडवाटांनी गोव्यात येतात, त्यांना पकडून सक्तीने निगराणीखाली ठेवण्याचे काम सुरू आहे.
राज्यात एक हजारपेक्षा जास्त व्यक्तींच्या आतापर्यंत कोरोना (कोविड-19) चाचण्या केल्या आहेत. गेल्या 3 एप्रिल रोजी शेवटचा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला होता. त्याच्यावरही कोविड इस्पितळात यशस्वी उपचार केले गेले. तो रुग्ण ठीक झाला. आता राज्यात एकही कोरोना रुग्ण नाही. शेवटचा रुग्ण सापडल्यानंतर चौदा दिवसांत जर नवा कोरोना रुग्ण सापडला नाही तर अशा कोणत्याही राज्याला अतिशय सुरक्षित मानले जाते. गोव्यात तर गेले वीस दिवस कोरोनाचा नवा पॉझिटिव्ह रुग्ण न सापडल्याने शासकीय यंत्रणांवरील ताण कमी झाला आहे.
आरोग्य खात्याच्या यंत्रणेकडून राज्यातील पाच हजार व्यक्तींची आता कोरोनाची चाचणी केली जाणार आहे. याशिवाय पंचवीस हजार व्यक्तींना श्वासोश्वासाचा त्रास आहे. त्यांच्यापैकी किती जणांना विदेश किंवा देशांतर्गत प्रवासाचा इतिहास आहे, ते पाहून त्यांचीही कोरोना चाचणी केली जाणार आहे.
1700 उद्योग सुरू राज्यातील औद्योगिक वसाहतींमध्ये स्थानिक कामगार वापरून उद्योग सुरू करावेत असे सरकारने स्पष्ट केल्यानंतर 1 हजार 400 उद्योग प्रथम सुरू झाले. त्यानंतर आज शुक्रवारपासून आणखी तीनशे उद्योग सुरू केले जाणार आहेत. औद्योगिक वसाहतींमधील व्यवस्थापकाकडून परवानगी घेऊन हे उद्योग सुरू केले जातात. वेर्णा औद्योगिक वसाहतीतील बहुतांश उद्योग सुरू आहेत. आरोग्य खात्याकडून सर्व उद्योगांतील कामगारांची यापुढे कोरोना चाचणी करण्याचा प्रस्ताव पुढे आणला गेला आहे.