पणजी : गोव्यातील सर्व नागरिकांची कोरोना चाचणी करण्याची गरज नाही, कारण गोव्यात कोरोनाचा सामाजिक प्रसार झालेला नाही. मात्र पूर्ण गोव्यात सर्वेक्षण केल्यानंतर जे संशयित वाटतील, त्यांच्याच नावांची शिफारस कोरोना चाचणीसाठी केली जाईल, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गुरुवारी येथे स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली व सर्वेक्षण हे कोरोनाविषयी लोकांत मोठी जागृती घडवून आणील व लोक जास्त काळजी घेऊ लागतील असा विश्वास व्यक्त केला.कोरोनाचा प्रसार कसा होतो व त्याविरुद्ध आयुर्वेदानुसार व अन्य पद्धतीने कशी काळजी घ्यावी याविषयी जागृती करणारी पत्रके घरोघर वाटली जातील. सर्व्हे करणा-या कर्मचा-यांच्या आरोग्याची पूर्ण काळजी घेतली जाईल. जो कर्मचारी ज्या गावात राहतो, त्याच गावात तो सर्वेक्षण करील. त्याला वाहतूक व जेवण सरकार पुरविल. ज्यांना डायबेटीस किंवा रक्तदाबाची समस्या आहे, त्यांना आम्ही सर्वेक्षणाचे काम दिलेले नाही. राजस्थानच्या बिलवारा जिल्ह्यात जसे दहा लाख लोकांचे सर्वेक्षण केले गेले, तसेच गोव्यात केले जाईल. गोव्यात त्यामुळे करोनाचा सामाजिक प्रसार होऊ शकणार नाही. लोकानी सर्वेक्षणावेळी खरीखुरी माहिती द्यावी. घरात कुणाला डायबेटीस असल्यास थंडी ताप झाल्यास कुणी अलिकडे विदेशात प्रवास केला असल्यास सांगाव. शेजा-यांबाबतही जर कुणाला काही माहिती असेल तर ती माहिती देखील देता येईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.सर्वेक्षणाचा निर्णय हा आरोग्य खात्यातील तज्ज्ञ अधिकारी तसेच आरोग्य सचिवांनी अभ्यासाअंती घेतला. तो राजकीय निर्णय नाही. सर्वेक्षण गोव्याला खूप उपयुक्त ठरेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.राज्यात आता मोठय़ा प्रमाणात मास्क उपलब्ध आहेत. सत्तर हजार लिटर सॅनिटायजरचीही निमिर्ती काही कंपन्यांनी केली व त्यापैकी वीस हजार लिटर त्यांनी सरकारी यंत्रणांना मोफत दिले आहेअसे मुख्यमंत्र्यंनी सांगितले.शिक्षकांकडून दिवसाचा पगारराज्यातील प्राथमिक शिक्षकांची संघटना आपल्याला भेटली. शिक्षकांनी एका दिवसाचा पगार कोविद मदत निधीसाठी दिला आहेअसे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. राज्यातील 164 पंचायतींनी मान्सूनपूर्व कामे सुरू केली. पालिकांनीही अशी कामे सुरू करावीत असे मुख्यमंत्री म्हणाले.सरकारी खर्च कमी करणारदरम्यान, पुढील वर्षभर सरकारी खर्च विविध पद्धतीने कमी केला जाईल. तो कसा कमी करावा हे ठरवण्यासाठी तिघा आयएएस अधिका-यांची समिती नेमली गेली आहे. गोव्याची अर्थव्यवस्था नव्याने सुरू व्हायला हवी म्हणूनही एक अभ्यास गट शुक्रवारपर्यंत स्थापन केला जाईल. त्यावर काही तज्ज्ञ असतील. लोकांनीही विविध व्यवसाय-धंद्यांना पुन्हा कशी चालना द्यावी याविषयी मेलद्वारे किंवा वॉट्स अॅपद्वारे सूचना कराव्यात असे मुख्यमंत्र्यांनी सुचविले.
Coronavirus : सर्व गोमंतकीयांच्या कोरोना चाचणीची गरज नाही : मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2020 7:48 PM