- पाच दिवसातच आरक्षण १५ ते २0 टक्क्यांवर पणजी - आंतरराज्य हद्दीत १ रोजी खुल्या केल्यानंतर हॉटेल आरक्षणात वृध्दी झाली आहे. अनलॉक ३ मध्येही सरासरी ५ टक्क्यांवर रेंगाळलेले खोल्यांचे आरक्षण बॉर्डर खुल्या केल्यानंतर गेल्या पाच दिवसातच १५ ते २0 टक्क्यांवर पोचले असून पर्यटन व्यावसायिकांना यामुळे आशेचा किरण दिसत आहे. पर्यटन व्यावसायिकांचे प्रतिनिधीत्त्व करणाºया टूर अॅण्ड ट्रॅव्हल असोसिएशन आॅफ गोवा (टीटीएजी) या संघटनेचे अध्यक्ष निलेश शहा म्हणाले की, ‘लॉकडाऊनपूर्वी जानेवारी, फेब्रुवारीपर्यंत गोव्यात रोज ८0 विमाने येत असत. आता अनलॉॅक ४ मध्ये ६0 टक्के म्हणजेच ४८ विमाने सुरु करण्यास परवानगी असतानाही प्रवाशी नसल्याने दिवसाकाठी केवळ ६ ते ७ विमानेच येतात. विमानांची संख्या वाढायला हवी. त्यातल्या त्यात अनलॉक ४ मध्ये बार चालू झाले ही पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पूरक बाब ठरली आहे. जलसफरी करणाºया बोटी, स्विमिंग पूल आदी चालू व्हायला हवेत.’शहा यांनी अशी माहिती दिली की, राज्यातील सुमारे ५00 हॉटेलमालकांनी हॉटेले खुली करण्यासाठी परवानगी मागितली होती. पैकी अंदाजे ३५0 हॉटेल्स सुरु होऊ शकली. व्यवसाय बंद ठेवून परवडणारे नाही. व्यावसायिकांबरोबरच हॉटेलमधील कामगार उपाशी पडतील तसेच सरकारला महसुलास मुकावे लागेल.’ शहा म्हणाले की,‘ कोरोना कधी जाईल याची शाश्वती नाही. तो येथे रहायलाच आला आहे, या भावनेने आता या संकटाशी प्रत्येकाने सामना करावा लागेल. ६ फूट शारीरिक अंतर, तोंडावर मास्क वापरणे या गोष्टी पाळून पर्यटन व्यवसाय नव्या जोमाने सुरु करण्यास हरकत नाही.’शॅकमालकांची व्दिधा मन:स्थिती दरम्यान, किनाºयांवर शॅक उभारण्याबाबत व्यावसायिक व्दिधा मन:स्थितीत आहेत. शॅकमालक संघटनेचे सरचिटणीस जॉन लोबो म्हणाले की, कळंगुट, कांदोळी भागात व्यावसायिक यंदा शॅक उभारण्यास अनुत्सुक आहेत. ते म्हणाले की, सध्या तरी ७0 ते ८0 टक्के व्यावसायिकांनी शॅक न उभारण्याचा निर्णय घेतलेला आहे. आंतरराज्य हद्दी खुल्या झालेल्या असल्या तरी पर्यटक येतीलच अशी शाश्वती नाही. कोविडमुळे यंदाचा हंगामही चुकणार असे वाटते.’कांदोळीचे शॅकमालक तथा संघटनेचे उपाध्यक्ष सेबी डिसोझा म्हणाले की, ‘गेल्या हंगामात व्यावसायिकांना बराच फटाक बसलेला आहे त्यामुळे कोविडच्या या महामारीत पुन: कोणी धजावणार नाहीत. पर्यटक येतीलच याची खात्री नाही. केलेली गुंतवणूकही भरुन येण्याची शक्यता कमी त्यामुळे व्यावसायिक स्वस्थ बसणेच पसंत करतील. अहवालात अनेक शिफारशी दरम्यान, राज्य सरकारच्या सार्वजनिक प्रशासन व ग्रामीण विकास संस्था (जिपार्ड)आणि उच्च शिक्षण संचालनालय यांनी संयुक्तपणे सादर केलेल्या अहवालात पर्यटन व्यावसायिकांना सरकारने कर्ज किंवा एकरकमी अनुदान देण्याची शिफारस अहवालात केली आहे. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी ही गोष्ट आवश्यक असल्याचे म्हटले आहे. मोठ्या रिसॉर्ट, हॉटेलांऐवजी राज्याच्या अंतर्गत भागांमध्ये पर्यटकांसाठी ‘होम स्टे’ संकल्पनेला चालना देण्यावर भर देण्याचे या अहवालात सुचविण्यात आले आहे.
coronavirus: आंतरराज्य हद्दी खुल्या केल्याने, गोव्यात हॉटेल आरक्षणात वृध्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2020 11:25 AM