मडगाव: जगभरात अडकलेल्या भारतीयांना पुन्हा मायदेशी आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिका सात आठवडे पुढे ढकलल्या असतानाही समुद्रात अडकलेल्या खलाशाना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारला आदेश द्यावे अशा आशयाची आणखी एक याचिका दाखल केली आहे.गोव्यातील व्यावसाईक आणि सामाजिक कार्यकर्ते केनेथ सिल्व्हेरा यांनी ही याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. या संबंधी ' लोकमत' शी बोलताना सिल्व्हेरा म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने जे निर्देश दिले आहेत ते जमिनीवर असलेल्या नागरिकांसाठी आहेत. आपण जी याचिका पाठविली आहे ती समुद्रात अडकलेल्यासाठी आहे असे ते म्हणाले.सध्या संपूर्ण जगात वेगवेगळ्या ठिकाणी सुमारे 200 जहाजावर 21 हजारापेक्षा अधिक खलाशी अडकून असून त्यात सुमारे 8 हजारांच्या आसपास गोवेकर आहेत. या खलाशाना परत आणण्यास सरकार त्वरित पाऊले उचलत नसल्याने गोव्यात या खलाशांच्या नातेवाईकामध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण आहे. लोकांचा बांध तुटल्यास ते रस्त्यावरही येऊ शकतील अशी परिस्थिती आहे.सिल्व्हेरा यांनी आपल्या याचिकेत समुद्रात अडकलेले खलाशी प्रचंड मानसिक तणावाखाली असून त्यांच्या कुटुंबियानाही घोर लागून राहिली आहे याकडे लक्ष वेधले आहे.कित्येकांना जहाजावरच मरण आले असून त्यांचे मृतदेहही तिथेच आहेत, कित्येकांना कोरोनाची लागणही झाली आहे. या परिस्थितीत ज्यांची प्रकृती चांगली आहे त्यांना त्वरित बाहेर काढणे गरजेचे असून त्यासाठी केंद्र सरकारला प्रत्येक देशातील भारतीय दूतावसाच्या साहाय्याने ह्या खलाशाना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी केली आहे.
coronavirus : समुद्रात अडकलेल्या खलाशांना मायदेशात आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 7:44 PM