पणजी : गोव्यात अन्नधान्य पुरवठ्याची सुत्रे अनेक आमदारांनी स्वत:च्या हाती घेतली आहेत. परिणामी धान्य पुरवठा व्यवस्थेचे पूर्ण राजकीयीकरण झाले आहे. जे आपले मतदार आहेत, त्यांनाच धान्य पुरविण्याचा मार्ग राजकारण्यांनी स्वीकारला आहे. राजकारण्यांशी कनेक्ट नसलेल्या गरीबांना यामुळे भूक सहन करावी लागत आहे.
पूर्ण देशात अन्न धान्याची दुकाने सुरु होती, तेव्हा सरकारने अगोदर गोव्यातील सगळी दुकाने बंद केली. लोकांच्या टीकेनंतर सरकारने दुकाने उघडी केली पण 30 आमदारांची बैठक घेऊन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी धान्य पुरवठा काम आमदार, सरपच, आमदारांचे कार्यकर्ते यांच्याकडे सोपवले. अनेक आमदारांनी लगेच मोठ्या दुकानदारांना हाताशी धरुन मालाचा स्वत: ताबा घेतला. राजकारण्यांनी माल साठवणे सुरु केले.
काही आमदारांनी स्वत: बेळगाव कोल्हापूर आदी भागांतून अन्नधान्याचे ट्रक भरुन आणले. काहीजणांनी भाजीचे ट्रक आणले. या व्यवस्थेत सरकारी अधिकारी व कर्मचारी कुठेच दिसत नाहीत. अनेक भागांमध्ये आमदारांनी आपल्या समर्थकांमध्ये मालाचे वितरण केले आहे. तिसवाडी तालुक्यातही हेच चित्र दिसत आहे. काही आमदारांनी माल साठवून ठेवला आहे. यापुढे गोव्यात धान्याची जेव्हा जास्त टंचाई होईल तेव्हा आम्ही आमच्या समर्थकांना धान्य वाटू अशी रणनीती भाजपच्या काही आमदारांनी ठरवून टाकली असल्याची माहिती कार्यकर्त्यांमधील चर्चेवरून मिळत आहे.
उत्पलचे मदत कार्य राजधानी पणजीत सुद्धा जी काही गरीब कुटुंबे राजकारण्यांशी कनेक्टेड नाही त्यांचे हाल होत असल्याचे पाहून स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल नाराज झाले. त्यांनी गोव्याच्या काही भागांतून धान्य मिळविले व महालक्ष्मी ट्रस्टतर्फे त्यांनी ते देऊळवाडा वगैरे भागात फुकट वाटले. आपल्याला धान्य मिळविण्यासाठी खूपच कष्ट घ्यावे लागले असे उत्पल पर्रीकर यांनी सांगितले.