पणजी : गोव्यात कोरोनाचा सातवा पाॅझिटीव्ह रुग्ण आढळला आहे. तिसवाडी तालुक्यातील सांतस्तेव्ह येथील नागरिक असलेली ही व्यक्ती अलिकडेच विदेशातून परतली होती.पर्यटनासाठी जगात प्रसिध्द असलेले गोवा राज्य कोरोनाबाबत सुरक्षित मानले जात होते. साडेपंधरा लाख लोकसंख्येच्या गोव्यात प्रथम फक्त पाच कोरोना रुग्ण सापडल्याने मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही गोवा कोरोनाबाबत सुरक्षित झोनमध्ये असल्याचे म्हटले होते. तथापि, गेल्या 48 तासांत कोरोनाचे दोघे पाॅझिटीव्ह रुग्ण सापडल्याने गोवा सरकारची आरोग्य यंत्रणा थोडी चिंतीत झाली आहे. तथापि आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी शनिवारी पहाटे लोकमतला सांगितले की, गोव्यात सापडलेला सहावा व सातवा हे दोन्ही रुग्ण विदेशातूनच आले होते. तसेच तत्पूर्वी सापडलेल्या पाचपैकी चार रुग्णांनीही विदेशातून गोव्यात आगमन केले होते.
सातव्या रुग्णालाही लगेच मडगावच्या कोविड इस्पितळात ठेवले जाईल. त्याच्या सपर्कात ज्या व्यक्ती आल्या होत्या, त्यांचा शोध घेतला जात आहे असे मंत्री राणे यांनी सांगितले
सरकारच्या गोमेकाॅ इस्पितळात एकूण 28 संशयीतांच्या कोरोना चाचण्या केल्या गेल्या. त्यापैकी पंचवीस चाचण्यांचे अहवाल आले. चोवीस चाचण्यांचे अहवाल निगेटीव्ह आले. गोव्याने काही चाचण्या पुणे येथील प्रयोगशाळेतून करून घेतल्या. तिथून काही अहवाल येणे बाकी आहे. आतापर्यंत गोव्याने गेल्या दहा दिवसांत एकूण 200 संशयीतांच्या चाचण्या करून घेतल्या. फक्त सात पाॅझिटीव्ह निघाले. यापैकी पाचजण विदेशातून बोटीवरून आले होते. सातपैकी एक रुग्ण हा कोरोना पाॅझिटीव्ह रुग्णाचा भाऊ आहे. त्याला एकट्यालाच विदेशी प्रवासाची पार्श्वभूमी नाही.
गोव्याच्या सर्व सीमा पूर्ण सील आहेत. कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ व महाराष्ट्रातील पर्यटक देखील सध्या गोव्यात येऊ नयेत म्हणून सरकार काळजी घेत आहे. येत्या 14 रोजी कदाचित केंद्र सरकारने देशातील लाॅक डाऊन उठविला तरी गोव्याच्या सीमा मात्र त्यानंतरही काही दिवस बंदच राहतील असे गोवा सरकारचे म्हणणे आहे. गोव्यात निगराणीखाली असलेल्या दोघा व्यक्तींचा आतापर्यंत मृत्यू झाला पण त्यांची कोविद चाचणी निगेटीव्ह आली होती. कोरोनामुळे गोव्यात कुणाचाच मृत्यू झालेला नाही.गोव्यात एकूण 46 तबलिगी जमातचे नागरिक सापडले आहेत. गोवा सध्या दहा हजार स्थलांतरित मजुरांना मोफत अन्न देत आहे.दरम्यान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले की, गोव्यात सध्या सीमा सील असल्या तरी अनेक व्यक्तींना सीमांवरील आडवाटांचा आधार घेऊन गोव्यात येऊ पाहतात. गोव्यात आपला कुणी नातेवाईक वारला म्हणून आपण येतो अशी अनेक कारणे सांगितली जातात. गोव्यात सध्या परप्रांतातून कुणीच येऊ नये. पोलिस अटक करतील. जर खरोखरच वैद्यकीय आपत्ती असेल तर संबंधितांनी येण्यापूर्वी गोव्याच्या जिल्हाधिकारींची परवानगी घ्यावी असे मुख्यमंत्री म्हणाले.