पणजी - कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर गोव्यात तीन दिवसांचा लॉकडाऊन आजपासून सुरु झाला. राज्यभरात लोकांनी या लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद दिल्याचे दिसून आले. सर्वत्र रस्ते सुनेसुने झाले होते. बाजारपेठा पूर्णत: बंदच राहिल्या. कोविडची सर्वात जास्त लागण झालेल्या वास्को शहरवासीयांनी कडकडीत लॉकडाऊन पाळला.राज्यात सर्वत्र लोकांनी सहकार्य केल्याने यावेळी पोलिसी बळ वापरावे लागले नाही. सर्व प्रकारच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आलेली आहे तरीही साखळी, डिचोली भागात खनिजवाहू ट्रकांची वाहतूक मात्र बिनदिक्कत सुरु होती यामुळे संताप व्यक्त केला जात होता.जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणारी दुकाने, दूध विक्री, औषधालयें, वर्तमानपत्रांना या लॉकडाऊनमधून वगळण्यात आले होते. लोकांना दुध, पाव वगैरे वस्तू सकाळी उपलब्ध झाल्या. औद्योगिक वसाहतींमधील कारखानेही वगळण्यात आले होते. लॉकडाऊन उल्लंघनांबाबत तशी फारशी मोठी प्रकरणे घडलेली नाहीत. काही किरकोळ घटना घडल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाºयांनी सांगितले. कदंब महामंडळानेही बसगाड्या बंद ठेवल्या. एरव्ही कदंबच्या ५२४ पैकी १७८ बसगाड्या वाहतूक करीत असत. खाजगी बसेसही पूर्णपणे बंद होत्या. एरव्ही केवळ दहा टक्के खाजगी बसेस वाहतूक करीत असत.लॉकडाऊनमध्ये सर्व प्रकारच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आलेली आहे तरीही साखळी, डिचोली भागात खनिजवाहू ट्रकांची बिनदिक्कत वाहतूक सुरु होती. त्यामुळे हे लॉकडाऊन गरीबांसाठीच आहे का? खाण व्यावसायिकांना लागू होत नाही का? असे संतप्त सवाल नागरिकांनी केले. राज्यातील सर्व १८ ही जलमार्गांवरील फेरीबोटीही बंदच राहिल्या. नदी परिवहन खात्याचे अधिक्षक विक्रमसिंह भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसारकेवळ वैद्यकीय आणीबाणीच्या प्रसंगासाठी किंवा गोमेकॉ कर्मचारी, पोलिस यांच्यासाठीच फेरीबोट सेवो दिली जात आहे.
coronavirus: गोव्यात कडकडीत लॉकडाऊन, अनेक ठिकाणी शुकशुकाट
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2020 2:00 PM