- सुशांत कुंकळयेकर
मडगाव: भारतात पोहोचूनही मायभूमीवर पाय ठेवता येईल की नाही या विवंचनेत मागचे 40 दिवस जहाजावरच काढणारे ते 65 गोमंतकीय खलाशी शेवटी गुरुवारी सकाळी मुंबई बंदरावर उतरले. त्यांची तपासणी करून त्यांना हॉटेल्सवर ठेवण्यात येणार असून त्यांच्या घेतलेल्या कोविड19 चाचणीचा अहवाल येण्याची अपेक्षा आहे. जर त्यांची चाचणी निगेटिव्ह आली तर त्यांना गोव्यात पाठविण्यात येणार आहे.
मुंबई बंदरावर गुरुवारी सकाळी 11 च्या सुमारास ते उतरल्यानंतर येथे गोव्यात त्यांच्या कुटुंबीयांनीही सुटकेचा श्वास सोडला. आमचे कुटुंबीय आनंदात आहेत असे काही खलाशांनी मोबाईलवरून संपर्क करून सांगितले. 40 दिवसापूर्वी हे जहाज कोचीच्या बंदरात आले होते. या जहाजात एकूण 140 भारतीय खलाशी होते त्यातील 65 खलाशी गोवेकर होते.
या खलाशांना कोची बंदरात उतरण्यास परवानगी न मिल्यानंतर ते मुंबईत आणण्यात आले होते. तरीही त्यांना खाली उतरण्याची परवानगी न मिळाल्यामुळे हे जहाज परत युरोपमध्ये नेण्याचा निर्णय झाला होता. त्यामुळे हबकलेल्या या खलाशांनी आपला एक व्हिडीओ अपलोड करून आपली व्यथा मांडली होती. त्यानंतर वेगाने चक्रे फिरून या खलाशाना भारतीय भूमीवर उतरवण्याची परवानगी मिळाली होती.
एक खलाशी म्हणाला, आमचा धीर सुटल्यानेच आम्ही तो व्हिडीओ पाठविला. त्यामुळे आमचे कुटुंबीय अधिकच चिंतेत पडले. आम्हाला युरोपमध्ये नेले असते तर आमची स्थिती आणखी बिकट झाली असती.
गुरुवारी त्यांची तपासणी झाल्यानंतर बसमधून त्यांना हॉटेलमध्ये नेण्यात आले. एकूण तीन वेगवेगळ्या हॉटेलमध्ये त्यांची सोय करण्यात आली असून जर त्यांची कोविड19 चाचणी निगेटिव्ह आली तर शनिवारी किंवा रविवारी बसमार्गे त्यांना गोव्यात आणण्यात येईल अशी माहिती प्राप्त झाली आहे.