पणजी : राज्यात कुणाला कोरोनाची लक्षणो दिसून येतात काय, कुणाला ताप आलेला आहे का किंवा कुणी 15 फेब्रुवारीपासून आतार्पयत विदेशात प्रवास करून आलेले आहेत काय हे शोधून काढण्यासाठी सरकार राज्यभर येत्या 11 पासून तीन दिवस मोठे सर्वेक्षण करून घेणार आहे. प्रत्येक घराला भेट देऊन हे सर्वेक्षण करून घेतले जाईल. सुमारे सहा हजार कर्मचारी सर्वेक्षणाचे काम करतील.मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. येत्या 14 पर्यंत आम्हाला सर्वेक्षण पूर्ण करून घ्यायचे आहे. आम्हा 13 पर्यंत लक्ष्य ठेवले आहे. अंगणवाडी कर्मचारी, बीएलओ, शिक्षक, आरोग्य खात्याचे कर्मचारी यांचा वापर करून गोव्यातील प्रत्येक वाडय़ावरील प्रत्येक घरात सर्वेक्षण केले जाईल. एक अर्ज प्रत्येक कुटुंबाने भरून द्यावा लागेल. प्रत्येकी दोन कर्मचारी घरी येतील. लोकांनी खरीखुरी माहिती द्यावी. कारण आम्हाला कोरोनाचा सामाजिक प्रसार होण्यापासून गोव्याला वाचवायचे आहे. घरात किती भाडेकरू राहतात याविषयीही माहिती द्यावी. ही माहिती फक्त आरोग्य खात्याच्याच नोंदीमध्ये राहील, ती अन्य कारणास्तव वापरली जाणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.20 टक्के ज्यादा वेतन कोरोनाच्या कामाशी निगडीत जे कर्मचारी, डॉक्टर्स, परिचारिका, सफाई कामगार, सुरक्षारक्षक वगैरे काम करतात, त्या सर्वांना वीस टक्के ज्यादा वेतन दिले जाईल. जोपर्यंत हे काम सुरू राहील तोपर्यंतच्या सर्व महिन्यांसाठी मूळ वेतनश्रेणीच्या तुलनेत वीस टक्के ज्यादा वेतन त्यांना मिळेल. कंत्राटी कामगारांनाही ही वेतनवाढ लागू होईल. तसेच या सर्व कर्मचा-यांचा सरकार पन्नास लाख रुपयांर्पयत विमा छत्रही सरकार देणार आहे. जे अधिकारी, कर्मचारी कोरोनाशीनिगडीत काम करतात त्यांना रोज हॉटेलमध्ये ठेवले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. गोवा इंटरनॅशनल सेंटरचाही वापर सरकार करणार आहे.
CoronaVirus: संभाव्य कोरोनाग्रस्त शोधण्यासाठी गोव्यात तीन दिवस सर्वेक्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2020 8:36 PM