पणजी : गोव्यात कोरोना विषाणूची लागण झालेले आणखी दोन रुग्ण रविवारी सापडले. यामुळे एकूण पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या पाच झाली.
पुणेच्या प्रयोगशाळेतून गोव्यातील एकूण सोळा संशयितांचे अहवाल आले. त्यापैकी चौदा अहवाल नकारार्थी आहेत. त्यांना करोनाची लागण झालेली नाही.जे दोघे पॉझिटीव्ह सापडले आहेत, त्यातील एकटा हा बहामास देशातून गोव्यात येतानाच कोरोना विषाणू घेऊन आला. दुसरा रुग्ण हा गोव्यात पूर्वी सापडलेल्या तीनपैकी एका रुग्णाचा नातेवाईक आहे. अजून गोव्यातील 56 संशयीतांचे वैद्यकीय अहवाल मुंबईच्या प्रयोग शाळेतून येणे बाकी आहे. गोव्याची आरोग्य यंत्रणा आता अधिक सतर्क झाली आहे. सहाशे व्यक्तींना निगराणीखाली ठेवता येईल अशी व्यवस्था गोवा सरकार करत आहे. नौदल व लष्कराचेही छोटे इस्पितळ वापरासाठी घेण्याचा सरकारचा विचार आहे.
दरम्यान , बांबोळीच्या गोमेकाॅ इस्पितळात उपचार घेणार्या 68 वर्षीय ज्या महिलेचा मृत्यू रविवारी पहाटे झाला होता, त्या महिलेचाही अहवाल आला. तो नकारार्थी आहे. त्या महिलेने गोव्याबाहेर प्रवास केला नव्हता. कोरोनाच्या दृष्टीकोनातून तिची वैद्यकीय चाचणी केली गेली होती.68 वर्षीय महिलेला श्वासोच्छ्वासाचा त्रास होत होता. ती कोरोना संशयीत होती. अहवाल नकारार्थी आल्याने तिचा मृत्यू कोरोनामुळे झाला नाही हे स्पष्ट झाले