पणजी : राज्यातील सर्व रस्त्यांकडील पथदिप येत्या चतुर्थी सणापूर्वी दुरुस्त करा, सगळे पथदिप पेटायला हवेत, असा आदेश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सोमवारी वीज खात्याच्या वरिष्ठ अभियंत्यांना दिला. राज्यातील अनेक रस्त्यांवर वीज पेटत नाही. अनेक रस्ते अंधारात आहेत. एलईडी वीज दिवे नवेच लावले होते पण ते पेटत नाहीत असा अनुभव येतो. अनेक ग्रामपंचायतींच्या याविषयी तक्रारी आहेत. काही आमदारही तक्रारी करतात.
एकाबाजूने रस्त्यांवर सगळीकडे खड्डे आणि दुसरीकडे हे खड्डेमय रस्ते अंधारात बुडालेत अशा स्थितीत राज्य सापडले आहे. वीज खाते रस्त्यांवरील पथदिपांची देखील नीट काळजी घेऊ शकत नसल्याने लोकांमध्ये नाराजी आहे. मुख्यमंत्री सावंत यांनी सोमवारी पर्वरी येथील सचिवालयात वीज खात्याच्या अभियंत्यांची बैठक घेतली. मुख्य वीज अभियंत्या रेश्मा मॅथ्यू यांच्यासह अनेक वरिष्ठ अभियंते बैठकीत सहभागी झाले. मुख्यमंत्र्यांनी स्थितीचा आढावा घेतला. प्रत्येक मतदारसंघनिहाय पथदिप दुरुस्तीविषयी अहवाल तयार करा आणि तो संबंधित क्षेत्रतील वीज अधिका:यांना सादर करा, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. या पथदिप दुरुस्तीसाठी कोणत्या भागात कोणत्या साहित्याची गरज आहे, याविषयीची माहिती अहवालात समाविष्ट करा व प्रत्येक रस्त्यावरील पथदिप पेटेल, दुरुस्त होईल याची काळजी घ्या, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्याचे सुत्रांनी सांगितले.
चतुर्थी सणावेळी पथदिप पेटायला हवेच, शिवाय गणोश मूर्ती विसजर्नाच्या ठिकाणीही वीजेची व्यवस्था करून द्यावी, अशीही सूचना मुख्यमंत्र्यांनी बैठकीत केली. सध्या पाऊस थांबलेला आहे. तरीही काही ग्रामीण भागांमध्ये अजून वीजेचा खेळखंडोबा सुरू आहे. त्यावरही वीज अभियंत्यांनी उपाय काढणो गरजेचे आहे.