पणजी : विद्यार्थ्यांमधील ताणतणाव ही जागतिक समस्या बनली असताना गोवा हे देशातील एकमेव राज्य आहे, जेथे इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सरकारने समुपदेशक नेमले आहेत. राज्यातील २0८ माध्यमिक विद्यालये आणि ५७ हायर सेकंडरींमध्ये ७२ समुपदेशक आणि १७ पर्यवेक्षक गोवाशिक्षण विकास महामंडळातर्फे कार्यरत आहेत.
समुपदेशकांच्या प्रमुख म्हणून काम करणा-या परीशा प्रभुगांवकर यांनी विद्यार्थ्यांच्या समस्यांचे वेगवेगळे पैलू ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत उघड केले. त्या म्हणाल्या की,‘ इयत्ता नववीत पोचल्यानंतर विद्यार्थ्यांना शिक्षणाबाबतचा ताण तणाव प्रचंड असतो. चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होण्यासाठी पालकांचा दबाव, परीक्षेबद्दलची भीती या गर्तेत विद्यार्थी सापडतो आणि त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. समस्याग्रस्त एकूण विद्यार्थ्यांपैकी ३0 टक्क्यांहून अधिक विद्यार्थी इयत्ता नऊवीतील असतात. वर्षाकाठी १५ हजारांहून अधिक प्रकरणे हाताळली जातात.
नेमक्या कोणत्या समस्या विद्यार्थ्यांमध्ये आढळतात, असा प्रश्न केला असता त्या म्हणाल्या की, ‘ मानसिक आरोग्य, अभ्यासातील अडचणी, भावनिक तसेच करियरशी संबंधित समस्यांव्यतिरिक्त अशा ताणतणावाचे प्रमाण लक्षणीय आहे. मुलींमध्ये आरोग्याच्या समस्याही असतात. मासिक पाळीसारख्या समस्यांमध्ये मुली गोंधळून जातात. त्यांना या वयात समुपदेशनाची गरज असते.’
तुम्ही अशा प्रकारच्या समस्या कशा प्रकारे हाताळता या प्रश्नावर त्या म्हणाल्या की, ‘सकारात्मक दृष्टिकोन देणे आणि त्यांच्यातील कौशल्य हेरुन कला गुणांना वाव देणे अशी कामे आम्ही करीत असतो. एखादा विद्यार्थी जास्तच ताणावाखाली दिसून आला तर गरजेनुसार पालकाच्या संमतीने मानसोपचार तज्ञाकडून वैद्यकीय उपचारही करुन घेतले जातात.’
अधिक माहिती देताना त्या म्हणाल्या की,‘शिक्षण विकास महामंडळाने २0१३ साली ६५ समुपदेशक आणि १२ पर्यवेक्षक घेऊन सरकारी व अनुदानित विद्यालयांमध्ये हा उपक्रम सुरु केला. विद्यालयामध्ये १ हजारपेक्षा जास्त विद्यार्थीसंख्या असल्यास आठवड्यातून तीन दिवस समुपदेशक या विद्यालयांमध्ये जात असतात. समुपदेशक तसेच पर्यवेक्षकांसाठी वेळोवेळी कार्यशाळा तसेच प्रशिक्षण कार्यक्रम घेतले जातात. दर आठवड्याला तालुका स्तरावर समुपदेशकांच्या तसेच पर्यवेक्षकांच्या बैठका घेतल्या जातात. या कामाचा वेळोवेळी आढावा घेतला जातो. समुपदेशकांचेही काही प्रश्न असतात. त्यांच्यासाठीही कार्यशाळा घेतल्या जातात.