पणजी - महिलांना समुपदेशन करण्याबरोबरच त्यांच्या समस्या दूर करण्यासाठी वावरणाऱ्या नास्नोळें, मयडें पंचायतीच्या पंच सदस्य पूजा मयेंकर या महिला स्वयंसाहाय्य गटांना एकत्र आणून मार्गदर्शन करण्याचे काम करीत आहेत. कृषी खात्याच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन एजन्सीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनाही सहकार्य केले आहे. शेतकरी सल्लागार गट समितीवर त्या सदस्य आहेत. महिलांसाठी अळंबी पैदास प्रशिक्षण वर्गही घेतले आहेत.
२00९ पासून त्या जनसंपर्कात आहेत. नास्नोळें, मयडेंसह बस्तोडा, उसकई, पालयें, हळदोणे, किटला, खोर्जुवें, कारोणा, कालवी, भागात त्या महिलांच्या उत्कर्षासाठी कार्यरत आहेत. महिलांना समुपदेशन करणे, सरकार दरबारी असलेल्या योजनांचा अधिकाधिक लाभ या महिलांना मिळवून देणे. नारळाच्या काथ्यापासून वस्तू बनविण्याचे प्रशिक्षण कार्यशाळाही गोवा चेंबर ऑफ कॉमर्सच्या मदतीने घेण्यात आली.
मे २0१८ मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्यांची हळदोणे महिला गट काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. परंतु त्याआधीपासून त्यांचे हे काम चालू आहे. नास्नोळें पंचायत क्षेत्रात महिलांकडून त्यांच्याच पुढाकाराने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. प्लास्टिक कचरा ही आजकाल मोठी समस्या बनली आहे त्यामुळे अलीकडेच त्यांनी आपल्या गावात हा उपक्रम राबविला.
उसकई खाजन शेतकरी कूळ संघटनेच्या सचिव म्हणूनही त्यांनी काम केले आहे. उसकई, नास्नोळें आणि मयडें येथील खाजन शेतकऱ्यांची ही संघटना आहे. शेतजमिनी पडीक ठेवल्याने तेथे मोठ्या प्रमाणात शेतांमध्ये गवत झाडी वाढलेली आहे ती काढून साफ करणे आवश्यक आहे. परंतु जमिनींच्या एक चौदाच्या उताऱ्यांमुळे काम रखडले आहे. मधमाशांद्वारे मध गोळा करण्याच्या बाबतीतही प्रशिक्षण देण्यात आले. महिला स्वावलंबी बनाव्यात हा त्यांचा हेतू आहे. गांडूळ खत तयार करण्याचे प्रशिक्षणही त्यांच्या पुढाकाराने शेतकऱ्यांना देण्यात आले. अनेक आंदोलनांमध्येही त्यांनी भाग घेतलेला आहे. मयडें भागात खंडित वीज पुरवठ्याची समस्या होती. वीज खात्यावर मोर्चा नेऊन आंदोलन करण्यात आले त्यात त्या अग्रभागी होत्या. दिल्लीत अखिल भारतीय महिला काँग्रेस संमेलनातही त्यांनी भाग घेतलेला आहे. एलपीजी गॅसचा दर महागला तेव्हा राजधानी पणजी शहरात केलेल्या आंदोलनातही त्या हिरीरीने सहभागी झाल्या.