लोकमत न्यूज नेटवर्क होंडा : गेल्या दहा वर्षांत केंद्रात सत्तेवर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सुरू केलेल्या विविध योजना तसेच साधनसुविधा निर्माण करून दिल्यामुळेच देशाचा चौफेर विकास झाला. त्यांच्या दूरदृष्टिकोनातून सुरू केलेल्या योजना देशातील कानाकोपऱ्यांत पोहोचल्या आहेत, असे उद्गार मतदारसंघाच्या आमदार डॉ. दिव्या राणे यांनी काढले.
देशात, राज्यातसुद्धा साधनसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांचे फार मोठे योगदान आहे. यामुळे आज देश विकासाच्या मार्गाने वाटचाल करीत आहेत. यापुढेसुद्धा संपूर्ण जगासमोर देश विकसित करण्यासाठी सर्व जनतेने विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढे आले पाहिजे. त्यांच्या संकल्पनेतून आज विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ सर्व ठिकाणी पोहोचत असल्याचे आमदार डॉ. दिव्या राणे म्हणाल्या.
होंडा येथे विकसित भारत संकल्प भाग २ या यात्रा कार्यक्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर सत्तरीचे गटविकास अधिकारी सूर्याजीराव राणे, होंडा जिल्हा पंचायत सदस्य सगुण वाडकर, सामाजिक कार्यकर्ते विनोद शिंदे, सरपंच शिवदास माडकर, उपसरपंच रेशम गावकर, पंच नीलिमा शेट्ये, कृष्णा गावकर, सुशांत राणे, नीलेश सातार्डेकर, दीपक गावकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी गटविकास अधिकारी सूर्याजीराव राणे यांनी सर्वांना विकसित भारत संकल्पाची शपथ दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आसावरी कुलकर्णी हिने केले. पंचायत सचिव मुला वरक यांनी सर्वांचे आभार मानले.
रखडलेल्या प्रकल्पांना, विकासकामांना चालना
आमदार डॉ. दिव्या राणे म्हणाल्या की, देशात २०१४ साली भाजप सरकार सत्तेवर येऊन पंतप्रधान मोदी यांनी देशाची धुरा आपल्या खांद्यावर घेऊन ग्रामीण भागातील जनतेला विविध प्रकारच्या योजना अंमलात आणून फायदा करून दिला आहे. देशपातळीवर गेल्या कित्येक वर्षापासून रेंगाळत असलेले सर्वसामान्य नागरिकांचे विषय सोडविण्यात आले आहेत. देशात आधुनिक क्रांती घडवून आणताना डिजिटल इंडिया, स्टार्टअप इंडिया, स्वच्छ भारत अभियान, हर घर नल से जल, उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून नागरिकांना सिलिंडर सेवा, हर घर शौचालय अशा योजना सुरू करतानाच सर्व नागरिकांना बँकेकडे जोडण्यासाठी जनधन योजना, पंतप्रधान जीवन ज्योती बिमा योजना, अशा प्रकारे शेकडो योजना करून जनतेला लाभ करून दिला आहे.
योजनांचा लाभ घ्या, अन्यथा संपर्क साधा : राणे
राज्यातील भाजप सरकारनेसुद्धा लाडली लक्ष्मी, गृहआधार, अटल आश्रय, दयानंद सामाजिक सुरक्षा योजना, दीनदयाळ स्वास्थ्य सुरक्षा योजना अशा योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यात आल्या आहेत; मात्र या योजनांपासून कुणीही वंचित राहिल्यास स्थानिक पंच यांच्या माध्यमातून आपल्या कार्यालयाकडे संपर्क साधावा, असे आवाहन आमदार राणे यांनी केले.