पणजी: मुलींच्या शिक्षणाच्या बाबतीत गोव्याचा आदर्श देशाने घ्यावा, असे उद्गार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गोवा विद्यापीठात आयोजित पदवीदान सोहळ्यात बोलताना काढले. गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा, मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर, वरुण साहनी व इतर मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते.या सोहळ्यात एकूण ९ हजार यशस्वी विद्यार्थ्यांना डॉक्टरेट, पदव्युत्तर प्रमाणपत्रे, पदव्या व पदविका देण्यात आल्या. विविध अभ्यासक्रमात सुवर्ण पदक पटकावलेल्या विद्यार्थ्यांपैकी ६० टक्के मुली आहेत. एकूण ६७ सुवर्णपदकांपैकी ४१ सुवर्ण पदकांच्या मानकरी या मुली आहेत. आपल्या भाषणातून या आकडेवारीचा विशेष उल्लेख करून राष्ट्रपती म्हणाले की, ही केवळ गोवा विद्यापीठासाठीच आणि गोव्यासाठीच अभिमानास्पद गोष्ट नाही तर संपूर्ण देशासाठी गौरवास्पद आहे. मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहीत करणे म्हणजे काय ते इतर राज्यांनी गोव्याकडून शिकावे. या कामगिरीचा उल्लेख त्यांनी गेम चेंजर या शब्दात केला. राष्ट्रपती झाल्यानंतर कोविंद यांची ही पहिलीच गोवा भेट होती.गोवा विद्यापीठातील पोर्तुगीज व लुसोफोन अभ्यास विभाग आणि समुद्र विज्ञान विभागांचे कौतुक करताना त्यांनी या विषयात खूप संधी असल्याचे सांगितले. गोवा विद्यापीठातील संशोधनात्मक उपक्रमासाठीच्या व्हिजिटिंग अद्यापन हा प्रकार संपूर्ण देशात वैशिष्ट्यपूर्ण असल्याचे सांगून इतर विद्यापीठांनी यापासून शिकण्यासारखे असल्याचे ते म्हणाले.राज्यपालांच्या विद्यार्थ्यांना शपथाराज्यपाल मृदुला सिन्हा यांनी यावेळी आपले भाषण संपविण्यापूर्वी विद्यार्थ्यांना काही शपथा दिल्या. विद्यार्थ्यांनी हात वर करून शपथा घेतल्या. शपथा अशा: आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवू नका, विवाह अनिवार्य नाही, परंत आवश्यक आहे. विवाह केल्यानंतर एकमेकांना सन्मान देत जगा, कोणत्याही युवतीवर किंवा महिलेवर अत्याचार होवू देणार नाही, नशा करणार नाही, अस्वच्छता करणार नाही व करू देणार नाही.
मुलीच्या शिक्षणाबाबत देशाने गोव्याचा आदर्श घ्यावा- राष्ट्रपती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2018 5:38 PM