सूरज नाईक पवार / मडगाव
मडगाव: एका सोळा वर्षीय युवतीवर कथित बलात्कार प्रकरणातील खटल्याच्या सुनावणीस कायमस्वरुपी अनुपस्थित राहण्याची अनुमती न्यायालयाने या खटल्यातील प्रमुख संशयित व गोव्याचे महसूलमंत्री बाबुश मोन्सेरात यांना दिली आहे. शुक्रवारी येथील खास न्यायालयाचे न्यायाधीक्ष इर्शाद आगा यांच्या न्यायालयात हा खटला सुनावणीस आला. न्यायालयाने पुढची तारीख ५ जून दिली असून, त्या दिवशी साक्ष नोंदणीस सुरुवात होईल. पहिली साक्ष पिडीत युवतीची आहे.जून पासून, आठवडयाच्या प्रत्येक सोमवार, बुधवार व शुक्रवारी हा खटला सुनावणीस येणार आहे.
आपला अशील मंत्री असल्याने त्याला मिटींग व अन्य कामे असतात, त्यामुळे या खटल्यात त्याला कायमस्वरुपी गैरहजर राहण्यास परवानगी दयावी अशी मागणी मोन्सेरात याच्या वकिलांनी न्यायालयात केली होती. ती मान्य करण्यात आली. न्यायालयाला या खटल्याच्या सुनावणीस पाहिजे तेव्हा प्रत्यक्ष हजर वा व्हिडीओ कॉन्फरिसंगव्दारे उपस्थित राहू असेही मोन्सेरात यांच्या वकिलाने न्यायालयात सांगितले. या खटल्यात एकूण वीस साक्षिदारांची साक्ष न्यायालयात नोंदवून घेतली जाणार आहे. २०१६ साली बलात्काराची वरील घटना घडली होती. या प्रकरणात बाबुश मोन्सेरात व रुझारिया उर्फ रोझी फेर्राव हे संशयित आहेत. पिडित युवतीला गुंगीचे पेय पाजून तिच्यावर बलात्कार केला होता.न्यायालयात शुक्रवारी सुनावणीच्या वेळी संशयित रोझी या हजर होत्या.