म्हापसा : भलत्याचीच ऑडी कार ओएलएक्सवर विकून एका व्यक्तीला ६ लाख ३० हजार रुपयांना गंडा घातल्या प्रकरणी कळंगुट पोलिसांनी दोघां विरोधात गुन्हा दाखल केला आहे. निरीक्षक परेश नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार एडविन लॉरेन्स यांनी या संबंधीत तक्रार दाखल केली होती. त्यात त्यांनी हा फसवणुकीचा प्रकार २ ते ३ डिसेंबर दरम्यान घडल्याचे म्हटले होते. केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी शेल्डन वाझ (अंधेरी-मुंबई ) तसेच एका गॅरेजचे मालक रोहनकुमार कुकामी (कळंगुट) यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.
संशयित एडविन लॉरेन्स यांनी ओएलएक्सवर ऑडी कार विकण्यास असल्याचा पोस्ट घातला. त्यानुसार तक्रारदार लॉरेन्स यांनी संशयिताशी संपर्क साधला. विक्रीसाठीची कार कळंगुटातील रोहनकुमार कुकामी याच्या गॅरेजीत होती. लॉरेन्स यांनी संशयितांना ६ लाख ३० हजार रुपयांची रक्कम देऊन कारची खरेदी केली. मात्र कारची खरेदी करुनही ती नावावर करण्यास संशयितांनी हयगय केल्याने तसेच कार संशयितांच्या नावावर नसल्याचे आढळून आल्यानेआपली फसवणुक झाल्याचे समजतात लॉरेन्स यांनी तक्रार दाखल केली. पोलिसांनी भादस. च्या कलम ४२० व ३४ कलमा अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक अक्षय पार्सेकर करीत आहे.