वास्को: एकत्रीत बसून मद्यसेवन केल्यानंतर राहीलेली बाटली घेऊन गेल्याचा राग आठवडाभर मनात बाळगून ठेवल्यानंतर आलेक्स झेवीयर फ्रांन्सीस कुतीनो (वय३४) नामक तरुणाने लायनल उर्फ पिंकूश लोबो (वय३५) याच्या डोक्यावर ‘सिमेंट ब्लॉक’ ने हल्ला करून त्याचा खून केल्याचा प्रकार मंगळवारी (दि.२) रात्री कुठ्ठाळी परिसरात घडला. खून करणारा आलेक्स आणि खून झालेला लायनल मित्र असून आठवड्यापूर्वी आलेक्सने थोडे पैसे जमवून दारूची बाटली आणल्यानंतर दोघांनी पाजेंन्तार, कुठ्ठाळी येथे बांधकाम चालू असलेल्या इमारतीत बसून मद्यसेवन केले होते.
राहीलेली बाटली लायनल घेऊन गेल्याने आलेक्स त्याच्यावर बराच चिढून त्यांने तो राग मनात ठेवला होता. मंगळवारी रात्री बांधकाम चालू असलेल्या इमारतीत लायनल मद्यसेवन करून गाढ झोपल्याचे आलेक्सला दिसून येताच त्यांने त्याच्या डोक्यावर ‘सिमेंट ब्लॉक’ ने जोरदार हल्ला करून त्याचा खून केला. त्या खून प्रकरणात चौकशीत करीत वेर्णा पोलीसांनी लायनलचा खून करणारा संशयित आरोपी आलेक्सला गजाआड केली असून त्यांने खूनाची कबूली दिल्याची माहीती दक्षिण गोवा पोलीस अधिक्षक सुनिता सावंत यांनी दिली.
दक्षिण गोवा पोलीस अधिक्षक सुनिता सावंत यांनी दिलेल्या माहीतीनुसार, मंगळवारी रात्री ७.३० वाजता तो खून घडला. आगशी येथे राहणारा महेंद्र बरड याचे पाजेंन्तार, कुठ्ठाळी येथे इमारतीचे बांधकाम चालू आहे. त्याच्या बांधकाम चालू असलेल्या इमारतीत लायनल लोबो नामक ३४ वर्षीय तरुणाचा रक्ताने माखलेला मृतदेह पडलेला असल्याची माहिती मिळताच त्यांने त्वरित तेथे धाव घेतली. लायनलचा रक्ताने माखलेला मृतदेह तेथे पडून जमिनिवर मोठ्या प्रमाणात रक्त सांडलेले असल्याचे त्याला दिसून आले. तसेच तेथे एक ‘सिमेंट ब्लॉक’ पडलेला असून त्याच्यावरही रक्त लागले असल्याचे त्याला दिसून आले.
‘सिमेंट ब्लॉक’ ने हल्ला करून खून
बांधकाम चालू असलेल्या आपल्या मालकीच्या इमारतीत तरुणाचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह पडल्याचे महेंद्रला दिसून येताच त्यांने त्वरित वेर्णा पोलीसांनी माहीती दिली. पोलीसांनी घटनास्थळावर येऊन तपासणीला सुरवात केली असता लायनलच्या डोक्यावर ‘सिमेंट ब्लॉक’ ने हल्ला करून त्याचा खून केल्याचे उघड झाले. लायनलच्या डोक्यावर हल्ला केल्याने डोक्याच्या कवटीला चीर पडून रक्तस्त्राव होत तो रक्ताने माखून मृतअवस्थेत पडल्याचे पोलीसांना दिसून आले. त्याचा मृतदेह पडलेल्या ठिकाण्यापासून इतरत्र रक्ताचे डाग असल्याचे पोलीसांना तपासणीत दिसून आले. लायनलचा खून झाल्याचे उघड झाल्यानंतर पोलीसांनी चौकशीला सुरवात केल्याची माहीती पोलीस अधिक्षक सुनिता सावंत यांनी दिली.
काही काळापासून कुठ्ठाळीत राहणारा लायनल कामगार, हॉटेलमध्ये वेटर इत्यादी छोटीमोठी कामे घेऊन स्व:ताचा उदरनिर्वाह करायचा अशी माहिती पोलीसांना चौकशीत मिळाली. लायनल आणि अन्य काहीजण अनेकवेळा बांधकाम चालू असलेल्या त्या इमारतीत बसून मद्यसेवन करायचे अशी माहिती पोलिसांना मिळाली. लायनलबरोबर मांडात, कुठ्ठाळी येथे राहणारा आलेक्स कुतीनो अनेकवेळा बांधकाम चालू असलेल्या इमारतीत बसून मद्यसेवन करत असून दोघेही मित्र होते, असे पोलीसांना समजले.
लायनलच्या कुटूंबातील सदस्य विदेशात
आलेक्स सुद्धा कामगार इत्यादी छोटी छोटी कामे घेऊन उदरनिर्वाह करायचे असे पोलीसांना चौकशीत समजले. पोलीसांनी त्वरित कारवाई करून आलेक्सशी चौकशीला सुरवात केली असता त्यांना त्याच्यावर संशय निर्माण झाला. संशय निर्माण झाल्याने पोलिसांनी आलेक्सशी कसून चौकशी केली असता अखेर त्यांने लायनलचा खून केल्याची कबूली दिल्याची माहिती पोलीस अधिक्षक सुनिता सावंत यांनी दिली. एका आठवड्यापूर्वी थोडे पैसे जमवल्यानंतर आलेक्स दारूची बाटली घेऊन बांधकाम चालू असलेल्या इमारतीत मद्यसेवन करायला बसला होता. तेव्हाच तेथे लायनल पोचला अन् दोघेहीजण मद्यसेवन करायला बसले. दोघांनेही मद्यसेवन केल्यानंतर त्या बाटलीत थोडी दारू राहिली होती. लायनलेने त्याला न विचारता तो ती बाटली घेऊन गेल्याची माहिती आलेक्सने पोलीसांसमोर उघड केली. आपण आणलेली बाटली लायनल घेऊन गेल्याने आलेक्सला त्याच्याबद्दल राग निर्माण होऊन त्याने तो राग मनात ठेवला होता.
आलेक्स मंगळवारी रात्री दारूच्या नशेत बांधकाम चालू असलेल्या इमारतीत आला असता तेथे दारूच्या नशेत धुंद होऊन लायनल गाढ झोपेत असल्याचे त्याला दिसून आले. दारूची बाटली नेल्याचा राग आलेक्सच्या मनात असल्याने त्यांने तेथे असलेला ‘सिमेंट ब्लॉक’ घेऊन लायनलच्या डोक्यावर जोरदार हल्ला करून त्याचा खून केला अशी कबूली त्यांने पोलीसांसमोर दिल्याची माहीती पोलीस अधिक्षक सुनिता सावंत यांनी दिली. लायनलचा खून आलेक्सने केल्याचे उघडकीस झाल्यानंतर बुधवारी (दि.३) सकाळी पोलिसांनी आलेक्स विरुद्ध भारतीय न्याय सहीतेच्या १०३ कलमाखाली गुन्हा नोंद करून सकाळी ११ वाजता त्याला अटक केली. पोलिसांनी श्वान पथक, ठसे तज्ञ, फोरेन्सीक तज्ञांच्या मदतीने खून झालेल्या ठिकाणी पंचनामा केला. तसेच लायनलच्या मृतदेहाचा पंचनामा करून तो शवगृहात पाठवून दिला आहे. लायनलच्या कुटूंबातील सदस्य विदेशात असून ते गोव्यात पोचल्यानंतर त्याच्या मृतदेहावर शवचिकीत्सा केली जाणार असल्याची माहीती दक्षिण गोवा पोलीस अधिक्षक सुनिता सावंत यांनी दिली. वेर्णा पोलीस त्या अधिक तपास करीत आहेत.