ऑनलाइन लोकमत
पणजी. दि. ५ : सांताक्रुझ मतदारसंघातील आमदार आतनासियो तथा बाबूश मोन्सेरात गुरुवारी दुपारी येथील रायबंदर येथे गुन्हा अन्वेषण विभागात शरण आले. त्यांना शरण येण्यासाठी ७२ तासांची मुदत दिली होती. बाबूश यांच्यावर बुधवारी रात्री बलात्काराचा गुन्हा दाखल केला. बाबूश यांच्यासमवेत त्यांच्या पत्नी जेनिफरही होत्या. त्या ताळगावच्या काँग्रेसच्या आमदार आहेत. आमदारांचे समर्थक कार्यकर्ते यावेळी त्यांच्यासमवेत होते. ईशान्येकडील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा गुन्हा पोलिसांनी बाबूश यांच्यावर दाखल केलेला आहे. पोलिस अधीक्षक कार्तिक कश्यप यांनी हे प्रकरण पणजी पोलिसांकडून गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग केले आहे.
सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून जास्त माहिती देणे योग्य नाही, असे ते म्हणाले. सर्व आरोपांचा इन्कार बाबूश यांनी सर्व आरोपांचा इन्कार केला आहे. आपल्यावरील आरोपांमागे राजकीय षड्यंत्र असल्याचे त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. आपल्यावरील आरोपांत तथ्य नसल्याचे न्यायालयात सिद्ध होईलच, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ५० लाखाला मुलीची विक्री ? माझी सावत्र आई आणि मावशीने मिळून मला पन्नास लाख रूपयांना बाबूश यांना विकल्याची तक्रार संबंधित पिडीत मुलीने पोलिसांत केलेली आहे. बाबूश यांनी या आरोपाचाही इन्कार केला आहे.
मुलीला भेटू देऊ नये आम आदमी पक्षाच्या निमंत्रक श्रीमती राजश्री नर्गेसकर यांनी गृहखाते सांभाळणारे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना पत्र लिहून बलाढ्य राजकारणी आणि अल्पवयीन परप्रांतीय कामगार यांच्यातील हे प्रकरण असल्याचा उल्लेख केला आहे. आरोपीला मुलीला कोणत्याही प्रकारे संपर्क करू देऊ नये तसेच भेटू देऊ नये अशी मागणी केली आहे. न्यायालयाच्या नियंत्रणाखालील विशेष तपास पथकाकडून या प्रकरणाचा तपास व्हावा, अशी मागणी नर्गेसकर यांनी केली आहे. (प्रतिनिधी)