किशोर कुबल ल्ल कळंगुट विद्यमान आमदार, पंचायत आणि विरोधी पक्ष यांच्यातील पराकोटीच्या राजकीय संघर्षाने या भागातील भीषण काळ्या व्यवहारांचा चेहरा उजेडात आणला आहे. वेश्या व्यवसाय, ड्रग्स यामुळे ही किनारपट्टी बदनाम झालेली आहे. येथील ज्वलंत प्रश्नांना भिडण्यासाठी आता ‘सेव्ह कळंगुट’च्या रूपाने तरुणांची फौज उभी ठाकली आहे. राजकारणी या ना त्या कारणाने स्वत:चे घोडे पुढे दामटण्याचे प्रयत्न करीत असताना दुसरीकडे ही तरुणांची फौज त्यांना भविष्यात भारी पडेल, अशीच चिन्हे दिसू लागली आहेत. ‘सेव्ह कळंगुट’चे उपाध्यक्ष नीतेश चोडणकर यांनी ‘लोकमत’च्या या प्रतिनिधीशी बोलताना पोलीस यंत्रणा, पंचायत, सरकार आणि राजकारणी यांच्यावर अक्षरश: आग ओकली. वेश्यांच्या दलालांना आम्ही पकडून देतो; परंतु पोलीस उलट आमच्याविरुद्धच गुन्हे नोंदविण्याची धमकी देतात. बेकायदा डान्स बार उद्ध्वस्त केल्याच्या प्रकरणात आमच्या तीन कार्यकर्त्यांविरुद्ध वेगवेगळी कलमे लावून गुन्हे नोंदविण्यात आले. पंचायतही कोणतीच कारवाई करीत नाही. चोडणकर म्हणाले की, दलालांच्या कारवाया इतक्या वाढलेल्या आहेत की, दिवे लागणीनंतर आमच्या आया-बहिणींना रस्त्यावरून चालणेही कठीण होते. एखाद्या मुलीकडे बोट दाखवायचे आणि गिऱ्हाईकाकडून अॅडव्हान्स पैसे उकळून पळ काढायचा, असे प्रकारही घडतात. यामुळे तंटा, मारामाऱ्या होतात. ड्रग्सच्या बाबतीत तर ‘टिटोज लेन’ हा ‘हब’ झालेला आहे. गावरावाडो येथे स्पा व सलून चालविण्यासाठी एका महिलेला पंचायतीने परवाना दिलेला आहे. कळंगुटच्या सरपंच पाश्कोला फर्नांडिस यांनी दीड लाख रुपये इतके अधिकृत आस्थापन परवाना शुल्क घेऊन परवाना दिलेला आहे. यावरून पार्लरांना पंचायत प्रोत्साहन देत असल्याचे स्पष्ट होते. बेकायदा व्यवहार बंद करण्यासाठी पंचायतीने मदत करायचे सोडून उलट प्रोत्साहन दिले जात आहे. डान्स बारवरील कारवाईबाबत ‘सेव्ह कळंगुट’चे म्हणणे स्पष्ट आहे. दक्ष आणि सजग नागरिकांनी केलेली ही कारवाई कळंगुट वाचविण्यासाठीच आहे. गावरावाडो येथे सेंट अॅन्थनी कपेलाजवळ असेच एक संशयास्पद मसाज पार्लर असल्याचा आरोप काही स्थानिक करतात.
कळंगुटमध्ये उफाळली गुन्हेगारी
By admin | Published: March 11, 2015 3:11 AM