- सुशांत कुंकळयेकर
मडगाव: मध्यप्रदेशातील मोस्ट वॉन्टेड सिरियल रेपीस्ट ईश्र्वर मकवाना हा गोवा पोलिसांच्या तवडीतून फरार झाल्याच्या पाश्र्र्वभूमीवर गोवा पोलिसांनी मध्यप्रदेश पोलिसांनाही सतर्क केले आहे. मात्र मध्यप्रदेशात आपला एनकाऊंटर होईल या भीतीनेच गोव्यात पळून आलेला भिल्ल जमातीचा हा आरोपी पुन्हा मध्यप्रदेशात जाण्याऐवजी जवळपासच्या जंगली भागातच आश्रय घेऊन आपल्या पुढील कारवाया करण्याची शक्यता पोलीस गोटातून व्यक्त केली जात आहे.
मध्यप्रदेश पोलिसांना मकवाना पन्नासपेक्षा अधिक बलात्काराच्या प्रकरणात हवा असून गोवा पोलिसांनी त्याला अटक करण्यापूर्वी त्याचे वास्तव्य बहुतेकवेळा जंगली भागातच होते असा खुलासा महु-मध्यप्रदेश येथील सहाय्यक पोलीस अधीक्षक नागेंद्रसिंग यांनी केला असून जंगली भागात कित्येक आठवडे रहाण्याची त्याला सवय आहे. गोवा पोलिसांच्या तावडीतून तो फरार झाल्याची माहिती मिळाल्यानंतर मध्यप्रदेशातील संपूर्ण पोलीस यंत्रणोला आम्ही सतर्क केले आहे. मध्यप्रदेशात तो आल्यास आम्ही त्याला जरुर अटक करु. पण तो येथे येण्याची शक्यता कमीच आहे असे सिंग यांनी सांगितले.
गोव्यातील बेताळभाटी येथील सनसेट बीचवर एका 20 वर्षीय युवतीवर सामूहिक बलात्कार केल्यानंतर दक्षिण गोव्यातून पळालेल्या ईश्र्वरने करमळी रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या जंगली भागाचाच आश्रय घेतला होता. नंतर पैशांच्या आमीषाने त्याला मडगावात बोलावून घेतल्यानंतर तो पोलिसांच्या तावडीत सापडला होता. परत पोलिसांच्या हाती लागू नये यासाठी शंभर किलो मीटरचे अंतरही तो पायी कापू शकतो अशीही शक्यता मध्यप्रदेश पोलिसांनी व्यक्त केली आहे.
यासंदर्भात दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक अरविंद गावस यांच्याशी संपर्क साधला असता, मकवाना याचा शोध घेण्यासाठी उत्तर तसेच दक्षिण गोव्यात खास पथकांची नेमणूक केली आहे. त्याला अटक करण्यासंदर्भात पणजी पोलीस मुख्यालयात एक उच्चस्तरीय अधिका:यांची बैठकही झाल्याचे त्यांनी सांगितले.
केवळ 24 वर्षे वय असलेल्या ईश्र्वर मकवाना याचा 50हून अधिक बलात्काराच्या प्रकरणात हात असण्याची शक्यता मध्यप्रदेश पोलिसांना असून 11 प्रकरणात त्याच्यावर आरोपपत्र दाखल झाले आहेत. मकवाना हा मध्यप्रदेशातील बाडगोंडा या आदिवासी भागातील भिल्ल जमातीचा असल्यामुळे त्याला तिथे ईश्र्वर भिल्ल या नावानेही ओळखले जाते. लहानपणापासून आपल्या मामाच्या घरी वाढलेल्या ईश्र्वरला ही गुन्हेगारीची दीक्षा त्याच्या मामानेच दिल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
मध्यप्रदेशात निर्जनस्थळी येणा:या प्रेमी युगुलांना गाठून त्यांना लुटण्याचा आणि त्यातील युवतीवर बलात्कार करण्याचा सपाटा संशयिताने मध्यप्रदेशात लावला होता. महू येथील नाकोडीकुंड या धबधब्यावर अशाचप्रकारे आलेल्या श्रेया जोशी व हिमांशी सेन या युगुलाची हत्या केल्यामुळे त्याला अटकही करण्यात आली होती. मात्र तेथेही पोलिसांच्या हातावर तुरी देऊन ईश्र्वर गोव्यात दाखल झाला होता. 24 मे 2018 रोजी बेताळभाटी येथील सनसेट बीचवर ईश्र्वरने आपल्या अन्य साथीदारांसह एका 20 वर्षीय युवतीवर बलात्कार केला होता. याच प्रकरणानंतर फातोडर्य़ाचे पोलीस निरीक्षक नवलेश देसाई यांनी त्याला व त्याच्या साथीदारांना सापळा रचून अटक केली होती.