पणजी : राज्यात कोणताही गुन्हा घडल्यानंतर त्या गुन्ह्यामध्ये जे सापडतात, त्या गुन्हेगारांना कडक शिक्षा व्हायला हवी. कडक शासन झाले तरच गुन्हेगारांना जरब बसेल, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी गुरुवारी लोकमतला दिलेल्या मुलाखतीवेळी व्यक्त केले.
पणजीहून पस्तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या मडगाव शहरात दिवसाढवळ्य़ा तिघा गुन्हेगारांनी एका सराफाचा खून करण्याची घटना घडली. लोकांच्या समोर सराफाचा जीव गेला. यामुळे पूर्ण गोवा हादरला. चोरीच्या उद्देशाने गुन्हेगार आले होते. ज्या स्वप्नील वाळके नावाच्या पस्तीस वर्षीय तरुण सराफाचा यात बळी गेला, त्याची आई भाजपची ज्येष्ठ पदाधिकारी आहे. या पाश्र्वभूमीवर बोलताना तानावडे म्हणाले, की पोलिस चोवीस तासांत गुन्हेगारांना अटक करतील असा आम्हाला विश्वास होता. सीसीटीव्हीमध्ये काही चेहरे दिसले होते. गुन्हा घडल्यानंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी त्याची गंभीरपणो दखल घेतली व पोलिसांना तपासावेळी पूर्ण स्वातंत्र्य दिले. तपास काम सध्या योग्य दिशेने सुरू आहे.
तानावडे म्हणाले, की तिघा हल्लेखोरांपैकी दोघांना पोलिसांच्या क्राईम ब्रँचने चोवीस तासांत पकडले. तिसरा आरोपीही निश्चितच पकडला जाईल असा आम्हा सर्वाना विश्वास आहे. मी स्वत: मडगावला भेट देऊन मयताच्या आईला भेटलो. खून झाल्याबाबत आम्हाला सर्वानाच फार वाईट वाटले. जिथे सराफाचे दुकान आहे, त्या दुकानालाही मी भेट दिली. दिवसाढवळ्य़ा तिथे खून होणो हे धक्कादायकच आहे. अशा प्रकारच्या गुन्हेगारांना कडक शासन व्हायला हवे ही लोकांचीही इच्छा आहे. गुन्हेगार सुटता कामा नयेत. अनेकदा काहीजण तुरुंगात राहून येतात व सुटल्यानंतरही पुन्हा गुन्हा करतात. गुन्ह्यांची संख्या कमी होण्यासाठी गुन्हेगारांना कडक शिक्षा व्हायला हवी. न्यायालयांनी गुन्हेगारांना कडक शासन करावे.