पणजी: अयोध्येत होत असलेल्या श्रीराम मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठानच्या पार्श्भूमीवर भाटले येथील श्री राम मंदिरात सकाळपासून विविध धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे श्रीरामाच्या दर्शनासाठी लोकांची सकाळपासूनच गर्दी होती. जय राम श्री राम जय जय राम अशा अखंड नाम जपात अत्यंत भक्तिमय वातावरणात लोकांनी श्री राम व हनुमानाचे यावेळी दर्शन घेतले.
देवस्थानतर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन दिवसभर करण्यात आले होते. सकाळी ७ च्या दरम्यान खास पूजा करण्यात आली. नंतर सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत अखंड राम नाम जपचे आयोजन करण्यात आले होते. तसेच दुपारी खास महाप्रसादाचे आयोजन देखील यावेळी करण्यात आले होते. रात्री ८ वाजता भजनाचा कार्यक्रम देखील यावेळी आयोजित करण्यात आला आहे.
आठवड्यापूर्वीच देवस्थानतर्फे या प्राण प्रतिष्ठान सोहळ्याच्या तयारीला लागले होते. देवळात स्वच्छता मोहीम करण्यात आली होती. आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. रविवारी संध्याकाळी पणजीत झालेल्या खास बाईक रॅलीचे स्वागत देखील स्वागत देखील देवस्थानतर्फे करण्यात आले होते. उपस्थित सर्वांचे यावेळी स्वागत झाले, तसेच जय श्री रामच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.
अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती लक्षवेधी
अयोध्येत ज्या प्रकारे श्री रामाचे भव्य मंदिर उभारले आहे, त्या मंदिराची प्रतिकृती भाटले येथील राम मंदिरात ठेवण्यात आली होती. सभागृहात ही प्रतीकृती मधोमध ठेवण्यात आल्याने खूप लक्षवेधी ठरली. तसेच महिलांनी मंदिर परिसरात काढलेली रॅलीने देखील लोकांच्या मनात देवाबद्दलची अस्था अधिक जागृत केली.