पणजी - वादळामुळे समुद्राच्या पाण्याची पातळी वाढल्याने गोव्याच्या किनारपट्टीला त्याचा फटका बसल्यानंतर येथील किनाऱ्यांवरील सीआरझेड उल्लंघनाचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. त्याचबरोबर राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाची निष्क्रियताही चव्हाट्यावर आली आहे. 'सरकारी यंत्रणेकडून या आपत्तीच्या वेळी कोणतीही मदत मिळाली नाही आम्हाला स्वतःचा या आपत्तीशी सामना करावा लागला, असे अखिल गोवा शॅक व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष क्रुझ कार्दोज यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
हवामान वेधशाळेने वादळाची आठ दिवसांपूर्वी कल्पना दिली होती. परंतु सरकारने काहीच हालचाली केल्या नाहीत. आम्हाला स्वतःला या संकटाची सामना करावा लागला. शॅकमध्ये पाणी घुसल्याने काही ठिकाणी तात्पुरती बांधकामे हटवावी लागली पलंग वाहून गेले. पर्यटन खात्याची किंवा जिल्हाधिकारी अथवा मामलेदार कार्यालयात कोणीही चौकशीसाठी आले नाहीत, असे अन्य शॅकमालकांनीही या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
दुसरीकडे अशा दुर्घटना टाळण्यासाठी आता भरती रेषेपासून दूर किनाऱ्यावर वाळूच्या टेकड्यांवर शॅक उभारण्याची परवानगी हवी आहे. कार्दोज म्हणाले की, किनाऱ्यापासून जरा मागे टेकड्यांवर शॅक उभारण्यासाठी परवाने दिले असते तर या वादळात शॅक बुडाले नसते. एकदम किनाऱ्यावर भरती रेषेपासून जवळ जागा देण्याऐवजी थोडी मागे दिली असती तर तेवढे नुकसान झाले नसते. किनारपट्टी व्यवस्थापन प्राधिकरणाला तशी विनंतीही करण्यात आली होती परंतु वाळूच्या टेकड्या असल्याने तेथे शॅक उभारण्यास परवानगी नाकारण्यात आली. वाळूच्या टेकड्या नष्ट होतील, अशी भीती प्राधिकरणाला असल्यानेच तेथे परवाना दिली जात नाही असे ते म्हणाले. शॅक उभारणी तात्पुरती असते त्यामुळे वाळूच्या टेकड्या नष्ट होण्याचा प्रश्नच नाही.
दुसरीकडे याबाबतीत शास्त्रज्ञांचे वेगळे मत आहे. येथील राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे माझी शास्त्रज्ञ डॉक्टर आंतोनियो मास्कारेन्हस यांच्या मते शॅकना वाळूच्या टेकड्या पासून किमान तीन मीटर अंतरापर्यंत परवानगी देताच कामा नये. परंतु एकदा का किनाऱ्यावर शॅक उभारण्यासाठी परवानगी मिळाली की वाटेल तसा विस्तार करतात आणि वाळूच्या टेकड्यांवरही अतिक्रमण करतात. वादळाच्या तडाख्यात पाण्याची पातळी वाढून शॅकमध्ये पाणी घुसण्याचा जो प्रकार घडला त्याला किनाऱ्यावरील सीआरझेड उल्लंघनाचे स्वर प्रकारही कारणीभूत आहेत. समुद्राला उधाण आले आणि पाण्याची पातळी वाढली तर या वाळूच्या टेकड्या संरक्षक भिंतीचे काम करुन गावच्या गांव वाचवतात. शॅकमालकांना मात्र त्यांचा व्यवसाय सुरळीत चालावा यासाठी आता या वाळूच्या टेकड्यांची ही गरज भासू लागली आहे.
अशी माहिती मिळते की, गोवा किनारपट्टी व्यवस्थापन प्राधिकरणाची स्पष्ट मार्गदर्शक तत्वे आहेत, जात असे म्हटले आहे की, वाळूच्या टेकडीपासून दूर कोरड्या जागेत शॅक उभारावेत. असे सांगितले जाते की, सोमवारी पौर्णिमा होती त्यामुळे आधीच समुद्राला भरती होती त्यात वादळाचा तडाखा बसला त्यामुळे पाण्याची पातळी आणखी वाढली. कार्दोज यांनी दिलेल्या माहितीनुसार मोबोर, केळशी, बाणावली भागात सर्वात जास्त झळ पोचली असून लाखो रुपयांची हानी झाली आहे.