लोकमत न्यूज नेटवर्क पेडणे: मांद्रे मतदारसंघाच्या विकासासाठी १०० टक्के सहकार्य करण्याची ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची दिली. पार्से येथे रविवारी आयोजित दीपोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. विकास कामे, मनोरंजन यासह संस्कृती संवर्धनाचे कार्यही महत्त्वाचे आहे. दीपोत्सवसारख्या कार्यक्रमातून आमदार जीत आरोलकर हे काम करत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
आमदार आरोलकर आणि मांद्रे उदर्गत संस्थेच्या सहकार्याने पार्सेतील खाजनगुंडो बांध तेथे आयोजित केलेल्या दीपोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळाला. मुख्यमंत्री सावंत, सिने अभिनेता अर्जुन रामपाल यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री सावंत यांच्या हस्ते विविध कलाकारांचा सन्मान झाला.
अर्जुन रामपाल यांनी दीपोत्सवातून समाधान मिळत असल्याचे सांगितले. यानिमित्त घेण्यात आलेल्या पेडणे तालुका मर्यादित आकाशकंदील स्पर्धेतील आकाशकंदील व रांगोळी स्पर्धेतील रांगोळ्यांनी लोकांचे लक्ष वेधून घेतले.
वेगवेगळे खाद्यपदार्थांचे स्टॉलही लावण्यात आले होते. त्यालाही लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. सुरुवातीला वैष्णवी उमा रघुनाथ जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली नाट्यरंभ स्कूल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांनी भरतनाट्यम् नृत्य सादर केले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी इतरही कार्यक्रम झाले. विद्युत रोषणाई आणि हजारो संख्येने आकाशकंदील पार्से खाजनगुंडो मुख्य रस्त्यालगत लावण्यात आले होते. ते पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.
स्थानिकांसाठी स्टॉल उभारणार : जीत आरोलकर
आमदार आरोलकर म्हणाले, की विकासासाठी मुख्यमंत्री सहकार्य करत आहेत. पुढच्या वर्षी याही पेक्षा दिव्य आणि भव्य स्वरूपात दीपोत्सव आयोजित केला जाईल. खाजनगुंडो परिसरात दुसऱ्या टप्प्यातील सुशोभीकरण करत असताना स्थानिक भूमिपुत्रांना किमान चार ते पाच स्टॉल उभारून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार आहे. या परिसराला पर्यटक वर्षभर भेट देत असतात. त्यामुळे या परिसरात खाद्यपदार्थचे पाच ते दहा स्टॉल उभारल्यास पर्यटकांची सोय होईल तसेच स्थानिकांनाही रोजगार मिळेल.