मडगाव : मडगावपासून सुमारे १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीतील बोट क्राफ्ट या फायबर ग्लासच्या बोटी तयार करणाऱ्या कारखान्याला आग लागून सुमारे १० कोटींचे नुकसान झाले. या कारखान्यात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फायबर बोटी तयार केल्या जायच्या. अशा प्रकारच्या १० बोटी तयार करुन ठेवण्यात आल्या होत्या त्याच्यासह अन्य सामग्री जळून खाक झाली.दुपारी १.३० च्या सुमारास ही दुर्घटना घडली. कारखान्याला लागलेल्या आगीमुळे उडालेले धुराचे लोट अन्य जवळच्या कारखान्यात घुसल्याने सगळीकडे भीतीचे वातावरण पसरले होते. या धुरामुळे श्वास कोंडू लागल्याने कारखान्यातील कामगार धावून बाहेर आहे. धुराचे लोट आकाशात पसरल्याने बघ्यांचीही गर्दी या कारखान्याच्या आवारात जमली होती.मिळालेल्या माहितीप्रमाणे या औद्योगिक वसाहत परिसरात कोणीतरी दुपारी गवताला आग लावली होती. तीच आग कारखान्यापर्यंत पोहचली. या कारखान्याच्या बाहेरच्या आवारात या फायबरच्या बोटी तयार करुन ठेवल्या होत्या. या फायबरने पेट घेतल्याने आग भडकली.ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्नीशामक दलाच्या १५ बंबाचा वापर करण्यात आला. सुमारे ४५ जवान ही आग अटोक्यात आणण्यासाठी वावरत होते. जवळपासच्या कारखान्यातही धुर पसरल्याने आजुबाजूच्या कारखान्यातील सुमारे ३५ कामगारांना बाहेर काढण्यात आले.कोलवा येथील जॉन फर्नांडीस यांच्या मालकीचा हा कारखाना असून सद्याजरी झालेली नुकसानी १० कोटींच्या घरात असल्याचे सांगण्यात येत असले तरी नुकसानीचा नेमका अकडा आगीच्या भक्षस्थानी किती वस्तू पडल्या त्यावरुन कळेल असे अग्नीशामक दलाच्या सुत्रांनी सांगितले.कामगारांना काकोड्याला नेले होतेमिळालेल्या माहिती नुसार जॉन फर्नांडिस यांचा अशाच प्रकारचा एक कारखाना काकोडा औद्योगिक वसाहतीत आहे व तेथे मोठाल्या फायबर ग्लास बोटी बनविण्याचे काम सुरु होते व त्या लगेच हस्तांतरीत करावयाच्या असल्याने कुंकळ्ळी कारखान्यातील अधिकतम कामगारांना काकोडा येथे नेले होते व त्यामुळे कुंकळ्ळीत अवघेच कामगार होते. आगीने पेट घेताच त्यांच्यावर एकच आकांत आला.जॉन याने सांगितले की राख झालेल्या बोटी पुन्हा बांधता येतील पण आगीत बोटींचे सर्व सांचेच खाक झालेले आहेत व त्यांची नेमकी संख्या किती आहे त्याची माहिती देखील आपणाला नाही. गेल्या पंचवीस वर्षांत गरजे नुसार वेगवेगळ््या आकाराचे हे सांचे तयार केले गेले होते. खाक झालेल्यांतील ६ तयार बोटी याच दिवसांत अंदमानला पाठविल्या जाणार होत्या.दुपारची वेळ असल्याने आगीने काही क्षणातच अक्राळ विक्राळ रुप धारण केले व त्यामुळे मडगाव, काणकोण, केपे , कुडचडे व फोंडा येथील अग्नीशामक दलांना वर्दी दिली गेली.
कुंकळ्ळीत फायबर बोट कारखान्याला आग, १० कोटींचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2019 7:42 PM