विद्यमान सरकारने राज्यातील जनतेची अवस्था जाळ्यात अडकलेल्या किड्यासारखी केली; काँग्रेसची टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2024 07:50 AM2024-10-14T07:50:26+5:302024-10-14T07:51:16+5:30
राज्यात विकासाच्या नावाखाली जे काही चालते ते पाहावत नाही. बेकायदेशीर गोष्टी वाढत चालल्या आहेत, अशी टीका काँग्रेस नेत्यांनी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यातील सामान्य लोकांची जी स्थिती आहे ती जाळ्यात अडकलेल्या किड्याप्रमाणे आहे. विद्यमान सरकारनेच ही अवस्था करून ठेवली आहे. आमच्या जमीनी आज परप्रांतियांच्या घशात घातल्या जात आहेत. आपण पोर्तुगीजांना दोष देत असलो, तरी राज्याच्या जमिनी शाबूत ठेवण्यासाठी त्यांनी केलेले कायदे महत्त्वपूर्ण आहेत, असे उद्गार माजी केंद्रीय कायदा मंत्री अॅड. रमाकांत खलप यांनी काढले.
सध्याच्या काळात राज्यातील जमिनी वाचवण्याची आणि चक्रव्यूहात अडकलेला गोवा त्यातून बाहेर काढण्याची जबाबदारी सत्ताधारी आणि विरोधकांची आहे, खलप म्हणाले. ज्येष्ठ पत्रकार गुरुदास सावळ यांच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक उपस्थित होते.
राज्यात विकासाच्या नावाखाली जे काही चालते ते पहावत नाही. बेकायदेशीर गोष्टी वाढत चालल्या आहेत. सीआरझेड नावाची गोष्टच आता राहिलेली दिसत नाही. हे सर्व थांबविण्यासाठी सर्वांनीच एकत्रित काम करणे आवश्यक आहे. आज राज्य उद्ध्वस्त होत असताना 'सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?' असे पुन्हा पुन्हा विचारले जाणे आवश्यक असल्याचे खलप यांनी सांगितले.
ज्येष्ठ पत्रकार गुरुदास सावळ यांनी राज्याच्या राजकारणाचा डोळस इतिहास लिहण्यास सुरुवात केली पाहिजे. गोवा सहकार मित्र मंडळाकडून सहकार क्षेत्रात जे आज चालले आहे त्याची चिकित्सा, चिरफाड करावी, असे आवाहनही अॅड. खलप यांनी केले. राज्यात मोठ्या प्रमाणात जमिनी विक्रीचा व्यवसाय सुरू आहे. बोगस कागदपत्रांच्या सहाय्याने अनेक व्यवहार केले जात आहेत. त्यामुळे लोकांनी योग्य पडताळणी करण्याची गरज असल्याचे अॅड. खलप म्हणाले.